पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द व मेहनतीच्या जोरावर काहीजण यश खेचून आणतात. नुकतेच 12 विचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये सुधागड तालुक्यातील आसरे येथील रोशन ज्ञानदेव लांगी याने तब्बल 35.67 टक्के मिळवून 12 वी (शाखा विज्ञान) परीक्षा पास केली. आई वडिलांचे छत्र नसतांना काम करून जिद्द व मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादित केले आहे. त्यामुळे त्याच्या या अनोख्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अवघ्या 10 वर्षांचा असताना रोशन चे वडील धरणात बुडून दगावले. त्यांनतर त्याची आई घर सोडून गेली. रोशन सोबत त्याची लहान बहीण व दोन वर्षांनी मोठा भाऊ होता. रोशन आपल्या काका कडे राहू लागला आणि सोबतच काकाचा डीजे चा व्यवसाय सांभाळू लागला हा व्यवसाय सांभाळतच तो आपला उदरनिर्वाह देखील करत आहे. मोठा भाऊ चौदाविला आहे तर बहीण दहावीत आहे. अगदी लहान वयातच रोशनी आपली भावंड व स्वतःची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि आज बरोबर स्वतःच्या पायावर उभे राहत 17 नंबरचा फॉर्म भरून बारावी सायन्स ची परीक्षा दिली. घरची जबाबदारी सांभाळत कामधंदा करत मिळेल त्या वेळेमध्ये अभ्यास करून रोशन ने बारावीची परीक्षा पास केली. त्याला पुढे आणखी शिकायचे आहे. त्याच्या या जिद्दीला व मेहनतीला सर्वांनी सलाम केला आहे.
अत्यंत लहान वयात कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेत रोशनने चिकाटी, जिद्द व मेहनत या जोरावर बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याला पस्तीस टक्के गुण मिळाले असले तरी त्याच्या पाठीमागे त्याची मेहनत व प्रतिकूल परिस्थितीवर केलेली मात दिसून येते.