स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ या दुसऱ्या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील शाळा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील टॉप 20 शाळांमध्ये सुधागड तालुक्यातील नेणवली शाळेची निवड झाली आहे. ही शाळा रायगड जिल्ह्यात अव्वल आली आहे.
अनेक स्वच्छता अभियान करून देखील परिसर अस्वच्छ दिसतात कारण कचऱ्याबाबत निष्काळजीपणाची सवय टिकून आहे. ही असामाजिक सवय मोडून काढण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना केवळ “मॉनिटरगिरी” करत निष्काळजीपणा करणाऱ्या व्यक्तीला जागीच चूक दर्शवून, त्या व्यक्तीलाच झालेली चूक दुरुस्तीसाठी विनंती करण्याची सवय होणे जरुरी आहे. ठीक ठिकाणी थांबवले गेल्याने ही असामाजिक सवय मोडून निघेल अशी प्रकल्प संचालक रोहित आर्या यांची संकल्पना आहे.
PLC स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ अभियानाचा प्रभावी परिणाम अनुभवल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांने ५ डिसेंबर २०२३ राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केले. त्याच बरोबर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक उपक्रमात सर्वाधिक 10 गुणांचे महत्व दिले होते.
अशी केली स्वच्छता मॉनिटरगिरी
विद्यार्थ्यांने केलेली स्वच्छता मॉनिटरगिरी, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याबाबत निष्काळजीपणा करणाऱ्यांना जागीच थांबवण्याच्या घटनेचे अनेक अनुभव सोशल मीडिया वर शेअर करणे. या अभियानाच्या कालावधीत रजीप नेणवली शाळेच्या विद्यार्थ्यांने असंख्य वेळा कचऱ्याबाबत होणारा निष्काळजीपणा जागीच थांबवला. त्यातील सुमारे 200 अनुभवांच्या विवरणाचे व्हिडिओ शेअर केले आणि राज्यात टॉप ट्वेंटी मध्ये स्थान पटकावले. त्यामध्ये राज सोनावळे, पुजा मगर, आर्या मगर, साक्षी सोनावले, अलका वाघमारे यामध्ये सर्वाधिक राज सोनावळेने 60 अनुभव शेअर करुन मोलाचे योगदान दिले.
या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित करण्याचे तसेच त्यांच्या मनोगताचे व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर अपलोड करण्याचे भरीव काम शाळा समन्वय राजेंद्र अंबिके यांनी केले. मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहित केले.
या कामगिरीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, केंद्रप्रमुख कल्पना पाटील, गटशिक्षणाधिकारी साधूराम बांगारे शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी शाळेचे कौतुक केले.
“स्वच्छता मॉनिटर टप्पा-2 मध्ये नेणवली शाळा महाराष्ट्रात सर्वोतम ठरली हे सर्व श्रेय शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी दिलेल्या स्वच्छता योगदानाचे आहे, याचा अभिमान वाटतो”
राजेंद्र अंबिके, मुख्याध्यापक व स्वच्छता मॉनिटर समन्वयक, शाळा नेणवली