पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाच्या खटल्याचा निकाल नुकताच आला. मात्र त्या निकालाने सर्वच संवेदनशील नागरिक निराश झाले. प्रत्यक्ष मारेकरी असलेले सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली तर विरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. मारेकऱ्यांना शिक्षा झाली याचे समाधान व्यक्त होत असतानाच सूत्रधार मोकळे राहिले याची खंतही व्यक्त केली जात आहे. ही खंत व्यक्त करणारी निर्धार सभा महा. अंनिस पनवेल शाखेने नुकतीच आयोजित केली होती.
या सभेस प्रमुख उपस्थिती महा. अंनिस राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर, ऍड. तृप्ती पाटील यांची उपस्थिती लाभली. सुरुवातीस महेंद्र नाईक, प्रशांत ननावरे, रोहिदास कवळे, तनुश्री खातू, नाजुका सावंत, पूजा डांबरे यांनी निषेध व निर्धारपर मनोगत व्यक्त केले. ॲड. तृप्ती पाटील यांनी कायद्याचे धोडक्यात विश्लेषण केले. निकालातील समाधानकारक गोष्टी तसेच न्यायालयाने तपास यंत्रणेवर कोणत्या गोष्टींवर ताशेरे ओढले हे स्पष्ट केले. तसेच कोणती कलमे लावली व त्यांचे स्वरूप स्पष्ट केले.
डॉ. पाटकर यांनी समाज, कार्यकर्ते यांची मानसिक अवस्था मांडली. गांधींच्या खूनानंतर उमटलेल्या प्रतिक्रिया आणि डॉक्टर दाभोलकर यांच्या खुनानंतर उठलेल्या प्रतिक्रिया यातला फरक पाहता आपण अधिक विवेकी वागत आहोत असे ते म्हणाले. आपण समाजालाही समजून घ्यायला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
या नंतर राज्य कार्यवाह आरती नाईक यांनी डॉ. दाभोलकर यांच्या खुनानंतरचा प्रवास व या निकालाविषयी संघटनेची भूमिका मांडली. अल्लाउद्दीन शेख यांनीही आपले मत मांडले. चार युवा कार्यकर्त्यांनी हिंसामुक्त समाजासाठी प्रत्येकी एक संकल्प मांडला. तो संकल्प प्रत्येकाने केला.
या सभेस अल्लाउद्दीन शेख, प्रवीण जठार, नवी मुंबई कार्याध्यक्ष अशोक निकम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रियांका खेडेकर हिने केले. सभेची सुरुवात डॉ. दाभोलकरांच्या अभिवादन गीताने झाली तर समारोप हम होंगे कामयाब या गीताने झाली.