बकरी ईद विशेष
रायगड (धम्मशील सावंत ) ईस्लाम धर्मात उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी “कुर्बानी” किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. बकरी ईद” साजरी करीत असतानाच मानवता व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्ह्यात रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. त्याच बरोबर जिल्ह्यातील काही मुस्लिम बांधव रक्तदान करतात व शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील करतात.
रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील प्राथमिक शिक्षक नुरखॉं पठाण दरवर्षी बकरी ईद विधायक पद्धतीने साजरी करतात. बकरी ईद निमित्त एखाद्या प्राण्याची कुर्बानी देण्यापेक्षा दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी आर्थिक कुर्बाणी देत त्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढ्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार आहेत.
मागील पंधरा वर्षांपासून बकरी ईद निमित्त ते हा उपक्रम राबवत आहेत. तसेच मागील चार वर्षांपासून रक्तदान करून बकरी ईद साजरी करतात. त्याच्या या विधायक कार्याला त्यांचे दोन भाऊ इब्राहिम व अल्ताफ हे देखील साथ देतात.
माणगाव तालुक्यातील नासिर वल्लाद हे इंजिनिअर गेल्या 25 वर्षांपासून बकरी ईद निमित्त रक्तदान करत आहेत. त्यांच्या या कार्याला त्यांच्या कुटुंबियांची देखील साथ आहे. अशाप्रकारे सण हे विधायक मार्गाने साजरे करण्याचा संकल्प करून त्याला कृतीची जोड देऊन नुरखॉं पठाण व नासिर वल्लाद यांसारख्या मुस्लिम बांधवांनी नवा आदर्श व अध्याय निर्माण केला आहे.
रक्तदान, सर्वश्रेष्ठ दान
पनवेल मधील विविध सामाजिक संस्था आयोजित आणि रोटरी ब्लड बॅंक यांच्या सहकार्याने
बकरी ईद निमित्त रविवारी (ता. 16) डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.आर्थिक कुर्बानी
बकरी ईद निमित्त नुरखॉं पठाण हे मागील 15 वर्षांपासून आर्थिक कुर्बानी देत आहेत. याद्वारे ते असंख्य विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल असे शैक्षणिक साहित्य देत असतात. त्यामुळे गोरगरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना शिकणे सुलभ व आनंददायी होत आहे.शिवाय त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात संविधानाचा एक अभ्यासक म्हणून असून ते वर्षाच्या ३६५ दिवस संविधान जनजागृतीचे कार्य सोशल मीडियावरिल पोस्ट, युट्यूब व व्हिडिओंच्या माध्यमातून करत असतात. तसेच राज्यात विविध ठिकाणी व्याख्यान देखील देतात. “आपले संविधान राज्यपद्धतीच नव्हे, तर जीवनपद्धती” नावाने नुरखॉं पठाण यांचे पुस्तक देखील प्रसिद्ध झाले आहे.
खरं तर अशा प्रकारच्या पब्लिसिटीची परवानगी धार्मिकदृष्ट्या मला नाही. परंतु या माहिती संप्रेषणाच्या जमान्यात बदलता काळ व गरजेनुसार कुर्बानीचा हा नवा अध्याय इतरांनाही अनुकरणीय ठरावा हा उद्देश आहे.
नुरखॉं पठाण, शिक्षककुर्बानी या संकल्पनेचा तसं बघितलं तर खूप व्यापक अर्थ आहे. परंतु कुर्बानी म्हटलं की, केवळ प्राण्यांचीच कुर्बानी हाच एक अर्थ घेतला जातो. काळाची गरज म्हणून कुर्बानी या शब्दाच्या व्यापक अर्थाला प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणे गरजेचे आहे.
नासिर वल्लाद, इंजिनियर
बकरी ईद निमित्त बकरे अथवा इतर प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिकाधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे हे धर्माचेच उन्नयन आहे. आपल्या सर्वधर्मीय संतांनी ही हीच शिकवण दिली आहे. हा विचार समोर ठेवून “बकरी ईद” साजरी करीत असतानाच मानवता व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून रक्तदान उपक्रम राबविला जातो.
महेंद्र नाईक, पदाधिकारी, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा पनवेल