बदलापूर -(प्रतिनिधी) – केंद्र सरकारने गेल्या वर्षी मंजूर केलेल्या नारीशक्ती कायद्यापासून प्रेरणा घेऊन बदलापूर पश्चिम येथील कविता रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण संस्थेने सोसायटीचा संपूर्ण कारभार 100% महिलांच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अकरा महिलांची कार्यकारीणी समिती बिनविरोध निवडून देण्यात आली आहे.
पुनर्विकासानंतर बांधण्यात आलेल्या 24 सदनिकांच्या या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झालेल्या बैठकीत सोसायटीचा कारभार 100% महिलांनी बघावा असा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानुसार पुढील प्रमाणे महिलांची कार्यकारीणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी ज्योती विवेक भावसार यांची, सचिवपदी अर्चना अमोल ताटकर तर खजिनदारपदी पूनम श्रीकांत राजवडे यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे हे तिन्ही पदाधिकारी कॉमर्समधील पदवीधर आहेत.
कार्यकारणीतील उर्वरित सदस्यांपैकी दीप्ती आशिष केतकर या सारस्वत बँकेच्या बदलापूर शाखेत सह व्यवस्थापक आहेत. तर 54 वर्षीय कल्पना ब्राह्मणकर या दहावी उत्तीर्ण असल्या तरी गेल्या दहा वर्षापासून त्या महिला बचत गटाच्या अध्यक्ष आहेत तसेच ग्रामसंग या 26 महिला बचत गटांच्या समूह गटाच्या खजिनदार पदाची जबाबदारी त्या समर्थपणे सांभाळत आहेत.
तेजल मनोज धनावडे यांच्याकडे कॉमर्स मधील पदव्युत्तर पदवी आहे तर शुभांगी किरण दुतोंडे या कॉमर्स मधील पदवीधर आहेत. ज्योती नितीन धामणे आणि तृप्ती ज्ञानेश बने यांनी नर्सिगचे शिक्षण घेतले आहे. 75 वर्षीय प्रतिभा प्रमोद जडे आणि उत्तर भारतीय समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गंगा शर्मा यादेखील कार्यकारणी समितीमध्ये आहे. सोसायटीचे अध्यक्ष ज्योती भावसार या मंत्रालय पत्रकारांच्या संघटनेत कार्यरत असलेले विवेक भावसार यांच्या पत्नी आहेत.
मुंबई महानगर प्रदेशात 100% महिलांनी चालवलेली कविता सहकारी गृहनिर्माण ही एकमेव संस्था असावी, असा दावा केला जात आहे.