पुणे, 16 मार्च : वंचित आणि ठाकरे गटात जागावाटपावरून जुंपली आहे. संजय राऊत खोटे बोलत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. तर मविआने वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यांच्या उत्तराचीच वाट पाहत आहोत, असे राऊत म्हणत होते.
महाविकास आघाडीने चार जागा वंचितला देत असल्याचा दावा केला आहे. यात अकोल्याच्या जागेचा समावेश आहे. यासह अन्य तीन जागा आहेत. वंचितच्या कार्यकारिणीची पुण्यात बैठक झाली. यामध्ये दोन जागा नाकारण्यात आल्या आहेत.
वंचितचे राज्य उपाध्यक्ष तथा प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी याची घोषणा केली. राज्य कार्यकारिणीने एकमताने हा प्रस्ताव फेटळाल्याचे ते म्हणाले. आम्ही अकोल्याची जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती, तरी आम्हाला हरण्याची शक्यता जास्त असलेल्या दोन जागा देण्यात आल्या.
या जागा आम्हाला नको, असे मोकळे म्हणाले. मविआच्या फेब्रुवारी महिन्यात अनेक बैठका झाल्या, त्यापैकी एकाही बैठकीला आम्हाला बोलविण्यात आले नाही. मार्चमध्येही बैठका झाल्या, अद्याप आमच्याशी मविआच्या कोणत्याही पक्षाने संवाद साधलेला नाही, असे मोकळे म्हणाले.