उंब्रज पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई.८६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.
उंब्रज कराड :प्रतिनिधी
कुलदीप मोहिते
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्यासाठी उंब्रज पोलिसांचे पथक अलर्ट आहे. उंब्रज ते सासपडे या मार्गावर दि .३ नोव्हेंबर रोजी बेकायदा दारूसाठ्याची वाहतूक होत असल्याची माहिती उंब्रज पोलीस ठाण्याचे
सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र भोरे यांना मिळाली. भोरे यांच्यासह पोलीस पथकाने अत्यंत चपळाईने सापळा रचत बेकायदा दारू वाहतूक करणारे वाहन अडवून दारूसाठ्यासह तब्बल ८६ हजार २५० रूपयांचा मुद्देमाल पकडला. पोलिसांच्या कारवाईने बेकायदा दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून अन्य काही व्यावसायिकही पोलिसांच्या रडारवर आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विधानसभा निवडणुकीची प्रचार यंत्रणा जोर धरू लागली आहे. या वातावरणातच अवैध व्यावसायिकांनी डोके वर काढायला सुरूवात केली आहे.दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांना गोपनीय बातमीदारा कडून माहिती मिळाली की, तानाजी मुरलीधर कमाने (रा. सासपडे ता. सातारा) हा उंब्रज ते सासपडे मार्गावरून बेकायदा दारूसाठा घेऊन चोरटी वाहतूक करणार आहे. स पो नि भोरे यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर यांना संशयित दारू तस्करावर वॉच ठेवण्याच्या सुचना देत उंब्रज सासपडे मार्गावर सापळा रचला. ठाणेकर यांच्यासह हवालदार संजय धुमाळ, प्रशांत सोरटे, श्रीधर माने, हेमंत पाटील यांनी हायवेवर पुणे बेंगलोर मार्गवर बोगद्यालगत संशयास्पद वाहनांवर नजर ठेवली. हवालदार माने यांना एक काळ्या रंगाचे मोटार सायकलवरून दोन संशयित एक पोते दोघांच्या मध्ये घेवून जाताना दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अडवून नावे विचारली. दुचाकीवर पुढे बसलेल्याने तानाजी मुरलीधर कमाणे (वय ४१ वर्ष रा. सासपडे ता. जि. सातारा) व पाठीमागे बसलेल्याने हर्षद सुनिल जाधव (वय २१ वर्ष रा. सासपडे ता. जि. सातारा) अशी नावे सांगितली. पोलिसांनी त्यांच्याकडील पोत्यातील साठा तपासला असता त्यामधे बेकायदा दारूसाठा सापडला. दारू वाहतूक करण्याचा कसलाही परवाना त्यांच्याकडे नसल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळत MH ११DC९८४९या दुचाकीसह मुद्देमाल हस्तगत केला. तब्बल ८६ हजार २५० रूपयांचा मुद्देमाल पकडून पोलिसांनी संशयितांकडे चौकशीसत्र सुरू केले. सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक ठाणेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.