रायगड (धम्मशील सावंत )शिहू विभागातील अंगण वाड्या स्मार्ट अंगणवाड्या करणार असल्याची ग्वाही भाजप पेण सुधागड रोहा विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर यांनी दिली.
ग्रुपग्रामपंचायत शिहू अंतर्गत चोळे अंगणवाडीच्या नविन इमारतीचे उदघाट्न भाजप पेण -सुधागड -रोहा विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.
अंगणवाडी चोळेच्या नविन वास्तूच्या उदघाट्न प्रसंगी बोलताना प्रसाद भोईर म्हणाले की आपल्याला अभिमान आहे की आपल्या माध्यमातून लहान लेकरांना सुसज्ज अशा नविन इमारतीत आपल्या आयुष्याची पहिली मुळाक्षरे गिरवता येतील.
परंतू ज्या प्रमाणे शहरी भागात आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट यांच्या माध्यमातून नर्सरी मध्ये लहान मुलांना प्रभावी शिक्षण दिले जाते त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील मुलांनाही शिक्षण मिळावे म्हणून ग्रुपग्रामपंचायत शिहू मधील या सर्व अंगणवाड्या स्मार्ट अंगणवाड्या बनविण्याचा संकल्प प्रसाद भोईर यांनी बोलून दाखविला. येत्या 15 दिवसात चोळे व शिहू येथील नविन अंगणवाडयांना ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ प्रसाद भोईर यांच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे प्रसाद भोईर यांनी सांगितले.
ग्रुपग्रामपंचायत शिहू अंतर्गत येणाऱ्या शिहू, तरशेत, मुंढाणी, बोरावाडी, जांभूळटेप, चोळे अशा सर्वच अंगणवाड्या युवा नेते प्रसाद भोईर यांच्या पुढाकाराने नवीन इमारत बांधकाम करण्यात आले आहे व उर्वरित शिहू -2,आटिवली यांच्याही मंजुरी घेण्यात आल्या आहेत.
त्या प्रसंगी बोलताना माजी सभापती संजय भोईर यांनी प्रसाद भोईर म्हणजे शिहू – कासू – नागोठणे विभागालाच नव्हे तर संपूर्ण पेण तालुक्यालाच लाभलेले विकसनशील नेतृत्व आहे. इतरांपेक्षा चाकोरीबाह्य व आधुनिक विचार करणे हे प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे.
तेव्हा भविष्यात येत्या काळात प्रसाद भोईर यांचे नेतृत्व खूप मोठे झालेले निश्चितच सर्वांना पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली.प्रसंगी पेण पंचायत समिती माजी सभापती संजय भोईर, ग्रुपग्रामपंचायत उपसरपंच अमृत कुथे, ज्येष्ठ नेते दत्ता कुथे, खंडू कुथे, तंटामुक्ती अध्यक्ष मोहन म्हात्रे, चिटणीस चंद्रकांत म्हात्रे, प्रविण कुथे, राजेंद्र म्हात्रे, हेमंत कुथे, कुमार कुथे, विजय पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
सदर अंगणवाडी इमारत उदघाटन प्रसंगी चोळे गावातील ग्रामस्थ विशेषतः महिला वर्ग व तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.