रायगड (धम्मशील सावंत )
रायगड जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम ५ जुलैपासून हाती घेण्यात येणार आहे.
ही मोहीम २० जुलैपर्यंत राबविली जाणार आहे. या मोहीमे अंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यात प्राथमिक समग्र शिक्षा कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती, डिजीटल शाळा, आय. एस. ओ. मानांकन, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, मध्यान्ह भोजन, विविध शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती परिक्षा तयारी, नवोदय परिक्षा तयारी अशा प्रभावी उपक्रमांची अंमलबजावणी अनुभवी व तज्ञ शिक्षकांमार्फत शाळांमध्ये सुरू आहे.
मात्र शासनाच्या अनेक योजना सुरू असतानाही अद्याप काही बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणेसाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन सदर मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, स्थलांतरित कुटुंबे, जिल्ह्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे, शेतमळे, जंगल, बालगृह, निरीक्षण गृह, विशेष दत्तक संस्था आदी ठिकाणी जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या नोंदी करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळाबाह्य मुलांच्या विशेष शोध मोहीम अंतर्गत ३ ते ६ वयोगटातील जी बालके एकात्मिक बाल विकास योजनेचा लाभ घेत नाहीत तसेच खाजगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांचे ज्युनिअर केजी, सिनिअर केजी मध्ये जात नाहीत व ६ ते १८ वर्ष वयोगटातील शाळाबाह्य बालके यांची शोधमोहिम घेण्यात येणार आहे. सदर कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी केले आहे.