रायगड . (धम्मशील सावंत ) गेल्या काही महिन्यांपासून चालू असलेल्या सुधागड तालुक्यातील भेरव आवंढे कामथेकरवाडी रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. परिणामी पाऊस तोंडावर असताना रस्त्याचे काम मात्र धीम्या गतीने चालू आहे त्यामुळे यंदा येथील ग्रामस्थांना चिखलातून प्रवास करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
भेरव आवंढे कामथेकरवाडी या रस्त्याच्या कामाला गेली काही महिन्यांपासून सुरुवात झाली असून काम सुरुवातीपासूनच कासव गतीने सुरू आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याला मान्यता मिळाली असून सिद्धी विनायक कंस्ट्रक्शन कंपनीना मिळाले असून सदरचे काम पोट ठेकेदार आर.डी. कंस्ट्रक्शन कंपनीने हाती हाती घेतले आहे.
सद्यस्थितीत रस्त्यावर फक्त बीबीएम झाले असून खडी अंथरूण त्यावर मातीचा भराव करुन दबाई करण्यात आली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी टाकण्यात आलेल्या मोऱ्यांची कामे देखील नुकतीच पूर्ण झाली आहेत.
भेरव ते कामथेकरवाडी हे ४ किमी चे अंतर असून काहीच दिवसांवर ठेपलेल्या पावसापूर्वी रस्त्याचे काम एवढ्या कमी अवधीत कसे पूर्ण होईल याचे चित्र समोर दिसत आहे. याच कंपनीने पाच्छापूर ते दर्यागाव या रस्त्याचे काम देखील हाती घेतले आहे त्यामुळे तिथली परिस्थितीतही जैसे थेच आहे.
ग्रामस्थांची परवड
या मार्गावर भेरव, आवंढे, खांडपोली, कामथेकरवाडी,पेडली आणि आदिवासी वाड्यावस्त्या आहेत. याठिकाणची लोकसंख्या देखील जास्त आहे. येथे एसटी महामंडळ च्या बसेस जात नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना वाहतुकीसाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. कामानिमित्त व्यवसायासाठी येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेरगावी जात असतात. विशेषतः याठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाली,पेडली, खोपोली सारख्या ठिकाणी जावे लागते. विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची मानवविकास बस च्या काही फेऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत असतात परंतु आता खराब रस्त्यामुळे किंबहुना रस्ताच नसल्याने बस देखील बंद करण्यात येईल. त्यामुळे आता येथील विद्यार्थी, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि प्रवासी यांचा प्रवास हा येणाऱ्या पावसात अतिशय खडतर बनणार हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
आम्हाला प्रवासासाठी हा एकमेव मार्ग आहे. रस्त्याचे काम पावसापूर्वी झाले नाही तर पावसाळ्यात चिखलातून प्रवास करावा लागेल. आवंढे वरुन पेडलीत जाण्यासाठी मधला रस्ता आहे. मात्र पावसाळ्यात त्यावरून पुराचे पाणी वारंवार जात असल्याने भेरव मार्गेच जावे लागते. रस्त्याचे काम अतिशय धीम्या गतीने व निकृष्ट पद्धतीने चालू असून संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सांगून देखील दुर्लक्ष केले जाते.
नरेश देशमुख, स्थानिक आवंढे.
मशनरीच्या बिघाडामुळे काम रखडले होते. खडीकरणाचे काम होत चालू होत आहे. परंतु पावसाळ्याआधी प्रवाशांची रहदारी योग्य व्यवस्था केली जाईल.