अलिबागचे मुख्य रस्ते बुडाले पाण्यात
रायगडात पावसाचे थैमान, जनजीवन विस्कळीत
आनंद घ्या; पण जपून
जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणी पोलीसबंदोबस्त तैणात; पर्यटनाचा आनंद घेताना सावधानता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन
रायगड (धम्मशील सावंत )
रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून सकाळपासून सर्वत्रच धुवांधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्जिकल वार्ड मध्ये पाणीच पाणी साचले होते.त्यामुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
अशीच परिस्थिती अलिबागच्या मुख्य रस्त्यावर दिसून आली, येथील अनेक रस्ते पाण्यात बुडाल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यातील धबधबे, धरणे, नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे नकळत निसर्गप्रेमींची पाऊले या स्थळांकडे वळू लागली अहेत. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातील ही पर्यटनस्थळे जितकी आकर्षक आणि मनाला आनंद मिळवून देतात, तितकीच ती धोकादायकही आहेत.
कुठे जाऊ नये याची कल्पना नवख्या पर्यटकांना अजिबात नसते. समोर दिसणारे पाण्याने भरलेले ढग, त्या ढगांना स्पर्श करण्याची चढाओढ करणाऱ्या हिरव्यागार पर्वतरांगा आणी या यातूनच कोसळणाऱ्या धबधबांमधून उसळणारे पाण्याचे तुषार अंगावर घेताना आपण ‘मृत्यूच्या सापळ्यात’ कधी अडकतात हे कळतच नाही.
मान्सून सुरु झाल्यापासून रायगड जिल्ह्यात बुडुन मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या १५ इतकी झाली आहे. ही जेमतेम दीड महिन्यातील मृतांची संख्या आहे. त्यामुळे जीवितहानी टाळण्याचे मोठे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासमोर उभे आहे. तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने नदीनाले तुडुंब भरलेले असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी अशा धोकादायक पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त तैणात केला आहे.
परंतु काही अतिउत्साही, हुल्लडबाज पर्यटक चोर वाटेने जावून आपला जीव धोक्यात घालतच असतात. त्यामुळे प्रशासनाने बंदीबरोबर आनंदमय पर्यटनासाठी जनजागृती सुरु केली आहे. पावसाळी पर्यटनातून रोजगारची संधी उपलब्ध होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांकडूनही यात सहभाग घेतला जात असून कुठे जाऊ नका आणि कुठे गेलात तर कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, याबद्दल माहिती दिली जात आहे.
काय करु नये
#परिसरामध्ये मद्यपान करणे
#सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणे
#धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह टाळावा
# फोटोग्राफी किंवा छायाचित्रणासाठी ड्रोनचा वापर करु नये
#रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करुन बेदरकारपणे वाहने चालवने
#धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करणे
#महिलांची छेडछाड करणे, टिंगळटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे
#सार्वजनिक ठिकाणी मोठ्य आवाजात संगीत यंत्रणा, डी.जे. वाजवणे
# महिला, मुलींनी उंच टाचेच्या चप्पला टाळाव्यात.
#पर्यटनस्थळावर लहान मुलांना एकटे सोडू नये.
पर्यटनाला जाताना काय करावे
#हवामान अंदाजाचा अभ्यास करुनच घरातून निघावे.
#पर्यटनासाठी जाणार असल्याची सर्व माहिती घरच्यांना द्यावी
(मित्रांचे मोबाईल क्रमांक, जाण्याचे ठिकाण, जाण्या-येण्याचा मार्ग आणि वेळ)
#पर्यटन किंवा भटकंतीसाठी निघण्यापुर्वी त्या ठिकाणचा भौगोलिक अभ्यास करावा.
#भटकंती किंवा पर्यटनासाठी एकट्याने जाणे टाळावे.
#पाय घसरु ये म्हणून ट्रेकिंगचे बुट वापरावेत
# डिजीटल साधने पाणी न जाणाऱ्या पिशवीत सुरक्षित ठेवावीत
#भटकंती करतेवेळी स्थानिक गाईड किंवा वाटाड्या सोबत घ्यावा.
#अंदाज न येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात जाणे व पोहणे टाळावे.
#बॅगमध्ये खाद्यपदार्थ, पाण्याची बाटली, प्रथमोपचार किट असावे.
#सोबत अधिकचे कपडे असावेत.
#जंगल भागात जाताना मच्छरांपासून बचाव होईल असे पुर्ण शरीरभर कपडे घालावेत.
#महिलांनी साडी पेक्षा पंजाबीड्रेस किंवा पॅंट टी-शर्ट सारख्या कपड्यांना पसंती द्यावी.