रायगड.(धम्मशील सावंत)
रायगड जिल्ह्यात मागील काही दिवसांत पावसाचा जोर चांगला वाढला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथून मिळालेल्या पावसाच्या अहवालानुसार गुरुवारी (ता. 11) पर्यंत जिल्ह्यात सरासरी 1091.36 मिमी पावसाची नोंद झाली आहे. येथील 28 लघु प्रकल्पांपैकी 13 लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. गुरुवारी (ता. 11) जिल्ह्यातील सर्व नद्या या इशारा पातळी व धोका पातळीच्या खाली वाहत होत्या.
जिल्ह्यात गुरुवारी (ता.11) पर्यंत सर्वाधिक पाऊस म्हसळा येथे 1509.0 मिमी तर सर्वात कमी उरण येथे 762.0 मिमी नोंद झाली आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची लावणीची कामे पूर्णत्वास येत आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व रस्ते व रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे.
नद्यांची पातळी (11 जुलै सकाळी 8 ची स्थिती)
कुंडलिक नदी – सद्यस्थिती 22.30 मीटर, धोका पातळी 23.95 मीटर, इशारा पातळी 23.00 मीटर
अंबा नदी – सद्यस्थिती 4.40 मीटर, धोका पातळी 9.00 मीटर, इशारा पातळी 8.00 मीटर
सावित्री नदी – सद्यस्थिती 3.10 मीटर, धोका पातळी 6.50 मीटर, इशारा पातळी 6.00 मीटर
पातळगंगा नदी – सद्यस्थिती 18.65 मीटर, धोका पातळी 21.52 मीटर, इशारा पातळी 20.50 मीटर
उल्हास नदी – सद्यस्थिती 43.70 मीटर, धोका पातळी 48.77 मीटर, इशारा पातळी 48.10 मीटर
गाढी नदी – सद्यस्थिती 2.00 मीटर, धोका पातळी 6.55 मीटर, इशारा पातळी 6.00 मीटर
जीवितहानी
मिळालेल्या माहिती नुसार 11 जुलै पर्यंत जिल्ह्यात आपत्तीमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील पेण तालुक्यातील सापोली येथील व्यक्ती झाड पडून, तर महाड दादली येथे नदीमध्ये पडून एक व्यक्ती मृत झाला आहे.
पशुधन हानी
जिल्ह्यात मोठी 5 व छोटी 2 जनावरे ज्यामध्ये म्हैस, रेडा व गाय मिळून 7 जनावरे मृत झाली आहेत. तर कोंबड्या व पक्षी 25 मृत झाले आहेत. मोठ्या जनावरांमध्ये दोन गाई आणि लहान जनावरांमध्ये दोन वासरे मिळून 4 जनावरे जखमी आहेत.
155 नागरिक स्थलांतरित
आत्तापर्यंत तब्बल 47 कुटुंबांचे स्थलांतर झाले असून यामध्ये 155 जणांचा समावेश आहे. महाड तालुक्यातील बिरवाडी येथील दोन कुटुंबातील पाच व्यक्ती नातेवाईकांकडे, तळा तालुक्यातील कडक्याची गाणी येथील 27 कुटुंबातील 70 व्यक्ती पिटसई येथील कुणबी समाज मंदिर येथे आणि मुरुड तालुक्यातील राजापुरी येथील 18 कुटुंबातील 80 व्यक्ती नातेवाईकांकडे असे मिळून 155 लोक स्थलांतरित करण्यात आले आहे.
मालमत्तेचे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार 11 जुलै पर्यंत 1 पूर्णतः पक्के घर, 33 अंशतः पक्की घरे व 24 अंशतः कच्ची घरे आणि 18 गोठे व एका दुकानाचे नुकसान झाले आहे. तर एका सार्वजनिक मालमत्तेचे महाड येथे अंशतः नुकसान झाले आहे.
एनडीआरएफ व एसडीआरएफ टीम सज्ज
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. रमाई विहार महाड येथे एनडीआरएफ व एसडीआरएफ टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. यामध्ये 2 इन्स्पेक्टर, 3 सब इन्स्पेक्टर, 29 जवान असे मिळून 34 जण तैनात आहेत.