Raigad District co-operative Bank I रायगड जिल्हा सहकारी बँकेची ६००० कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल

 

 

जून तिमाहीत पूर्ण केला ५७५० कोटींचा टप्पा

 

रायगड- धम्मशील सावंत

 

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील पहिल्या तिमाहीचे आपल्या संपत्तिक स्तिथीचे आकडे जाहीर करताना मागील आर्थिक वर्षाप्रमाणेच सातत्यपूर्ण घोडदौड सुरू ठेवली आहे जून २०२४ अखेर बँकेने ५७५० कोटींचा व्यवसाय टप्पा पार केला असून बँक लवकरच ६००० कोटींचा टप्पा पूर्ण करेल असा विश्वास बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी व्यक्त केला.

सातत्यपूर्ण कामगिरी, सहकारातील प्रभावी धोरण आणि तंत्रज्ञान स्नेही म्हणून बँकेने वेळोवेळी केलेले बदल यामुळे बँकेने हा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील उच्चपद्स्थ अधिकारी तसेच नाबार्डने बँकेच्या या कामगिरीचे कौतुक केलेले असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण, बँकेच्या सेवांमध्ये सातत्याने आधुनिकीकरण आणि त्यांच्या समवेत सांपत्तिक स्थितीमधील भरीव कामगिरी, संचालक मंडळाचे उपयुक्त मार्गदर्शन आणि प्रभावी व्यवस्थापन याबद्दल बँकेचे अभिनंदन केले आहे.

बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना रायगड जिल्ह्रातील ग्राहकांनी बँकेवरती दाखविलेला विश्वास आणि बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्यासह सर्व संचालक मंडळ हे एकमताने बँकेच्या उन्नतीसाठी काम करीत असल्याने हा प्रगतीचा आलेख उंचावण्यास मदत होत आहे याबद्दल आभार व्यक्त केले.

बँकेने या आर्थिक वर्षात २५००० पेक्षा अधिक नवीन ग्राहक जोडले आहेत, युपीआय, आयएमपीएस, स्टेटमेंट ऑन ई-मेल, क्युआर कोड यासारख्या आधुनिक सेवांसोबत ग्राहकांना लघुउद्योगासाठी तात्काळ कर्जसुविधा याद्वारे बँकेने आपला विस्तार वाढविला आहे. शिवाय बँकेने या आर्थिक वर्षात सीकेवायसीचे काम पूर्ण केलेले असून यामुळे देशभरातील कोणत्याही बँकेत व्यवहार करण्यास रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ग्राहकाला एकच ग्राहक क्रमांक उपलब्ध होणार आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची शून्य रकमेने हजारो खाती बँकेने सुरू केलेली असून त्याला चांगला प्रतिसाद ग्राहकांचा लाभत आहे त्याबद्दल देखील बँकेच्या अध्यक्षांनी ग्राहकांचे आभार मानले आहेत.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्रातील शेती आणि शेती आधारीत पुरक व्यवसायांना कर्जपुरवठा करीत असून त्याच्या समवेत व्यवसाय आणि उद्योजकांना कर्जपुरवठा करीत असल्यामुळे जिल्ह्रातील अनेक ग्राहकांचे बँकेशी तत्परतेचे नाते तयार झाले आहे.

बँकेने मागील आर्थिक वर्षात ७३ कोटी इतका ढोबळ नफा कमविला असून गृहनिर्माण सहकारी संस्था, पगारदार सहकारी संस्था, जिल्ह्रातील पतपेढया, अर्बन बँका, या जिल्हा सहकारी बँकेशी जोडल्यामुळे सहकारातून सहकाराची वृद्धी हे आजवर बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी जपलेले धोरण आम्ही यशस्वीरीत्या पुढे नेत आहोत आणि त्यामध्ये बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी बँकेच्या ग्राहकांशी आपुलकीचे नाते जपत आहेत, याबद्दल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी समाधान व्यक्त करत बँकेचे ठेवीदार, सभासद, कर्जदार आणि हितचिंतक यांच्यासह बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या योगदानाबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले आणि ६००० कोटींच्या व्यवसाय टप्पा पूर्ण करण्यासाठी बँकेतील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी सिद्ध असल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *