People’s Education Society I पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ७९ वा वर्धापन दिन साजरा

 

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ०८ जुलै १९४५ रोजी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही गरीब पण कष्टकरी, होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाच्या संधी पोहोचण्यासाठी उभारण्यात आली होती.

या शिक्षण संस्थेतून अनेक दिग्गज आज रोजी विविध क्षेत्रात व जगभरात नावाजलेले आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यालय ‘आनंद भवन’ फोर्ट मुंबई येथे असून, संस्थेचे पहिले महाविद्यालय सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बुद्ध भवन, फोर्ट, मुंबई येथे आहे.

आज दिनांक ८ जुलै २०२४ रोजी या संस्थेला ७९ वर्ष पूर्ण होत असून ; या प्रसंगी अनेक नमवांतांच्या उपस्थितीत ७९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

याप्रसंगी कार्यक्रमासाठी पीईएसचे अध्यक्ष श्री. आनंदराज आंबेडकर, ॲड. संघराज रूपवते (विश्वस्त, पीईएस) आणि संस्थेतील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येनी उपस्थित होता.

तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बुद्धवंदनेने वंदन करून; दीपप्रज्वलन व पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

पीईएसचे अध्यक्ष मा. आनंदराज आंबेडकर, विश्वस्त सदस्य ॲड. संघराज रुपवते, श्री. आशिष गाडे व विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे प्रा.डॉ.अशोक सुनतकरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्राचार्य अशोक सुनतकरी व इतर मुख्याध्यापकांचे स्वागत उपप्राचार्य रमेश झाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

डॉ. गवई, प्राचार्य आंबेडकर विधी महाविद्यालय, श्रीमती. संध्या डोके, प्राचार्य सिद्धार्थ विधी महाविद्यालय, डॉ. यशोधरा वऱ्हाडे, प्राचार्य आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय, डॉ. आरती वानखेडे, प्राचार्य आंबेडकर महाविद्यालय, महाड, श्री. डी.बी.पवार, सिद्धार्थ हायस्कूल, बेलापूर, प्रा.विजय मोहिते, मुख्याध्यापक, सिद्धार्थ नाईट स्कूल, आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

प्रा.डॉ.अशोक सुनतकरी यांनी प्रास्ताविकात, पीईएसच्या स्थापने मागील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका व त्यांनी घेतलेले कष्ट आपल्या प्रास्ताविकातून उधृत केले. त्यांनी ७९ व्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छाही व्यक्त केल्या. श्रीमती संध्या डोखे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखाली महिला प्राचार्य म्हणून विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा मान मिळाला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्री. डी.बी. पवार यांनीही आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पीईएस परिवाराने एकत्रित येऊन जोमाने काम करण्याची गरज व्यक्त केली.

डॉ. यशोधरा वऱ्हाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेच्या शाखांद्वारे समाजातील गरीब वर्गाला शिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आंबेडकर महाविद्यालय महाडच्या प्राचार्या डॉ. आरती वानखेडे यांनी कोणीही सापडत नाही तेव्हा स्वत: उभे राहण्याची भावना व्यक्त केली. त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाला “आनंदपर्व” असे संबोधून गौरवोद्गार व्यक्त केले.

आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गवई यांनी आपल्या भाषणात पीईएस अंतर्गत महाविद्यालये संपूर्ण महाराष्ट्रातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे कसे वळवता येईल व उत्तरोत्तर संस्थेची भरभराट कशी होईल या संदर्भात विचार व्यक्त केले. प्रा. विजय मोहिते यांनी पीईएसची स्थापना कशी झाली हे सांगितले. त्यांनी पीईएसच्या स्थापनेसाठी बहिष्कृत हितकारिणी ते कोलंबो या योजनेची तपशीलवार माहिती दिली.

ॲड. संघराज रुपवते, विश्वस्त पीईएस यांनी त्यांच्या काव्यात्मक शैलीने व ओजस्वी वाणीने सभगृहाला मंत्रमुग्ध केले. त्यांनी संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पीईएस अंतर्गत कसे काम करावे याचे मार्गदर्शन केले. राजकारणाने शिक्षण संस्थेचे नुकसान होऊ नये. पीईएस हे आधुनिक भारतात शिक्षणाचे स्वप्न दाखवण्यासाठी दीपस्तंभ म्हणून उभे आहे व राहील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गेल्या दोन वर्षात आतापर्यंत विविध महाविद्यालयांमध्ये यशस्वीपणे केलेल्या कामांचा आढावा घेतला. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सहकार्यासाठी मार्गदर्शन केले आणि संस्थेच्या विकासासाठी सकारात्मक दिशेने त्यांच्या क्षमतांचा उपयोग करावा. असे सांगून; जागतिक दर्जाचे महाविद्यालय निर्माण करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. ही संस्था समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारी आणि दर्जेदार शिक्षण मिळवून देणारी असल्याने ; सर्व माजी विद्यार्थ्यांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

 

सर्व प्राचार्य, इतर महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि पीईएसच्या छत्राखालील शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी NCC कॅडेट्स, NSS स्वयंसेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पद्माकर तामगाडगे तर आभार डॉ. सीमा घोष यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *