उमेदवार व पालक चिंतेत
रायगड (धम्मशील सावंत )-तीन महिने उलटून देखील राज्यशासनाच्या पवित्र पोर्टल अंतर्गत नवी मुंबई महानगर पालिकेच्या शाळेत निवड झालेले शिक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या 71 उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले आहे.
नियुक्ती देण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेकडून दिरंगाई होत आहे. परिणामी उमेदवार व पालक चिंतेत आहेत. शिवाय उमेदवारांचा महत्वाचा वेळ वाया जात आहे. इतर जिल्ह्यातील उमेदवारांना शाळा मिळून त्यांची नियुक्ती देखील झाली आहे, मात्र नवी मुंबईतील उमेदवार मात्र नियुक्ती वाट पाहत आहेत. पात्र उमेदवार मंगळवारी (ता. 18) आयुक्त कार्यालयात गेले होते. मात्र तिथे त्यांची निराशा झाली.
75 व्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने 75000 नोकर भरती करण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागातील शिक्षक पदे भरण्यासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षक भरती सुरु केली. त्याद्वारे शासनाने 25 फेब्रुवारी 2024 रोजी निवड यादी जाहीर केली.
व पुणे आयुक्त कार्यालयाकडून महाराष्ट्र शिक्षण आयुक्त सुरज मांढरे सर यांनी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेपूर्वी नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात त्या-त्या आस्थापनेला कार्यवाही करण्यासाठी सूचित केले गेले होते. मात्र नवी मुंबई महानगर पालिका शिक्षण विभागाने निवड यादी प्रसिद्ध झाल्याच्या 15 दिवसांनी म्हणजेच 11 व 12 मार्च 2024 रोजी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण केली.
मात्र मुळात कागदपत्र पडताळणीला पालिकेकडून विलंब झाल्याने 16 मार्च 2024 पासून लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागली असता पुढील सर्व प्रक्रिया ठप्प झाली. त्या दरम्यान 19/04/2024 रोजी आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडून ज्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली.
त्या आस्थापनेला शिक्षक भरती प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भातील निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीचे पत्र जारी केले. मात्र नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रात 20 मे 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडून देखील शिक्षक भरतीबाबतची कोणतीही कार्यवाही केली गेली नाही.
त्वरित 24 मे 2024 पासून कोकण शिक्षक पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने पुन्हा एकदा प्रक्रिया ‘जैसे थे’ अशी परिस्थिती उद्भवली. मात्र आता कोकण शिक्षक पदवीधर आचारसंहितेमध्ये पून्हा एकदा निवडणूक आयोगाने शिक्षक भरती प्रक्रियेची कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिल्याचे पत्र आयुक्त कार्यालय(शिक्षण),पुणे यांना दि.10 जून 2024 रोजीच्या पत्राद्वारे राज्य शासनाकडून कळविण्यात आले आहे.
त्यानुसार आयुक्त कार्यालय (शिक्षण) यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच दि.11 जून 2024 रोजी पुणे आयुक्त कार्यालयाकडून अधिकृत पत्र सर्व जिल्हापरिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद ह्यांना देण्यात आले आहे.
भेट निष्प्रभ
12 जून रोजी काही उमेदवारांनी शिक्षण विभागाला भेट दिली असता 18 जून रोजी आयुक्त 18 जून ला येतील तेव्हा तुमची प्रक्रिया सुरु होईल असे सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने मंगळवारी (ता. 18) कागदपत्र पडताळणी झालेले सर्व पात्र 71 उमेदवार महानगर पालिकेमध्ये उपस्थित होते मात्र तिथेही त्यांची निराशा झाली.
शिक्षण आयुक्तालय पूणे यांच्याकडून दि.11 जून रोजी कोकण पदवीधर निवडणूक आचारसंहिता कालावधी मध्ये शिक्षक भरतीप्रक्रिया सुरु ठेवण्याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीबाबतच्या संदर्भासहित पत्र सर्व महानगर पालिका आयुक्त, शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले होते, मात्र त्या पत्रातील आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेऊन भरती प्रक्रिया सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे या मुद्यावरून शिक्षण विभागात संभ्रम अवस्था असल्याचे निदर्शनास आले.
शिक्षण उपायुक्त यांची काही उमेदवारांनी भेट घेतली असता वरील मुद्यावरून आम्ही नियुक्ती आचारसंहिता कालावधीत देऊ शकत नाही असे स्पष्ट सांगण्यात आले. त्यामुळे उमेदवारांमध्ये कमालीची निराशा निर्माण झाली आहे. याबाबत शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्याकडून या मुद्याचे स्पष्टीकरण घेऊन आम्हाला नियुक्ती द्यावी असे उमेदवारांचे म्हणणे आहे. पुढील आचारसंहिता 25 जून पासून लागण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व उमेदवारांना 25 जून च्या आधी नियुक्ती देणे गरजेचे आहे.
नवी मुंबई महानगरपालिका मागे
नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरु झाले आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगर पालिका यांनी आपली शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण केली असून त्या त्या आस्थापनांमध्ये नवानियुक्त शिक्षक शाळेवर रुजू झाले आहेत. शिवाय काही आस्थापनामध्ये आचारसंहितापूर्वीच भरतीची प्रक्रिया पूर्ण होऊन नवनियुक्त शिक्षकांना रुजू होऊन 3 महिन्याचा कालावधी लोटला आहे. या सर्व परिस्थितीत सर्वात अग्रेसर असणारी नवी मुंबई महानगरपालिका मागे का राहिली? हा प्रश्न उमेदवारांना भेडसावत आहे.
निवेदनाला केराची टोपली
शिक्षण विभागात अनेक उमेदवारांनी संयुक्तिकरित्या 8 ते 10 वेळा निवेदने देऊनही कोणतीही अधिकृत सूचना अजूनपर्यंत उमेदवारांना प्राप्त झाली नसल्याने उमेदवारांमध्ये मानसिक तणाव वाढत आहे. तर पालकांकडून चिंता व्यक्त होत आहे.
सेवा कालावधीवर परिणाम
गुणवत्ता सिद्ध करून देखील भावी शिक्षकांना अशाप्रकारचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय एकाच दिवशी निवड यादी लागून देखील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तिमध्ये 3 महिन्याचा फरक पडणार आहे व पुढील सेवा कालावधीवर देखील फरक पडणार आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरीत या शिक्षकांना नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी उमेदवा्रांकडून व्यक्त केली जात आहे.
बेरोजगारीची कुऱ्हाड
फेब्रुवारी महिन्यातच निवडयादी व मार्च महिन्यामध्ये कागदपत्र पडताळणी होऊन आम्हाला महानगर पालिकेकडून पात्रतेचा शेरा मिळाल्याने 15 जून च्या आधी आम्हाला नियुक्ती मिळून आम्हाला शाळेत रुजू होता येईल हा विचार करून आम्ही खाजगी शाळेत करत असलेली नोकरी एप्रिल महिन्यातच सोडून आज बेरोजगार राहिलो आहोत. आणि मुंबईत नोकरीशिवाय दिवस काढणे कठीण होऊन बसले आहे. कुटुंबाची जबाबदारी देखील अंगावर आहे. आम्ही खूप मानसिक दबावाखाली असून पालिकेने याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करून आम्हाला 20 जून पर्यंत तरी नियुक्ती द्यावी अशी अपेक्षा करतो. असे नाव न सांगण्याच्या अटीवर सामान्य अभियोग्यता धारकाने सांगितले.
शिक्षक नियुक्तीसाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र सध्या कोकण पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता चालू असल्यामुळे नियुक्ती प्रक्रिया राबवता येत नाही. आचारसंहितेमुळे राज्यातील इतर काही ठिकाणची देखील प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आम्हाला केंद्र व राज्य शासनाच्या नियमांच्या अधिन राहून काम करावे लागते. आचारसंहिता संपल्यावर नियुक्ती प्रक्रिया राबवण्यात येईल. उमेदवारांना या संदर्भात काही माहिती हवी असल्यास त्यांनी मला प्रत्यक्ष येऊन भेटावे व त्यांचे प्रश्न मांडावे. तसेच उमेदवारांना आचारसंहिते संदर्भात माहिती आहे.
डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका