Dr. D. S. Kate I दुबई  येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी उद्योजक डॉ.डी.एस.काटे यांची निवड

 

 

रायगड: धम्मशील सावंत

मुक्त सृजन संस्था, मुक्त सृजन साहित्य पत्रिका व संस्कृती प्रकाशन,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे 05 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2024 दरम्यान पहिले विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन होत आहे.

सदर साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध उद्योजक व अर्थतज्ज्ञ डॉ.डी.एस.काटे स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे,असे मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ.महेश खरात यांनी जाहीर केले.

डॉ.डी एस काटे हे 1985 साली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून स्थापत्य अभियंता पदविका घेऊनही नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करणारे उद्योजक आहेत. केवळ उद्योजक आहेत असेच नव्हे तर ते एक अर्थतज्ज्ञ आहेत. त्यासंदर्भातील अर्थ योग हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे.

व्यवसायाच्या माध्यमातून व्याख्याने व शिबिरांद्वारे रोजगार निर्मिती व मार्गदर्शन ते करत आले आहेत. साहित्य, कला, क्रीडा व समाजसेवा या गोष्टीची त्यांना आवड आहे. महाविद्यालयीन काळात संसदेचे सचिव म्हणून ते निवडून आले होते. अर्थक्रांती चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते.

अर्थ दिशा,अर्थ जागर अर्थसंपदा ,अर्थनीती ही त्यांची महत्त्वाची गाजलेली पुस्तके आहेत. महात्मा गांधीचे अर्थ विचार हा त्यांच्या चिंतनाचा प्रांत आहे. संत चोखोबा ते संत तुकोबा, एक वारी समतेची, मंगळवेढा ते देहू संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.

त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात शब्दगंध साहित्य परिषदेचा शब्दगंध उद्योजकता गौरव पुरस्कार, विश्व समाज भूषण पुरस्कार, आदर्श भूमिपुत्र गौरव पुरस्कार, जेके जाधव साहित्य पुरस्कार ,असे राज्य व राष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

 

त्यांची दुबई येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे, असे सदर बैठकीत ठरले.

सदर बैठकीला डॉ. संतोष देशमुख,प्राचार्य डॉ. रामकिशन दहिफळे, प्रिया धारूरकर, डॉ. निलेश देगावकर, हनुमंत सोनवणे, डॉ.संभाजी पाटील, डॉ. किसन माने आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *