मुंबई : वाढते शहरीकरण, रासायनिक पदार्थांचा वाढता वापर, विषारी अन्नपदार्थांच्या सेवनाने आपण कॅन्सरला निमंत्रण देत आहोत. अशा परिस्थितीतून बाहेर यायच असेल तर आपल्या घरातूनच नैसर्गिक जीवन जगण्याच्या पद्धतीचा अवलंब सुरू करण्याचे आवाहन पीटर सिंग आणि नीनो कौर यांनी आज (३१ जानेवारी) मुंबईत केले.
अंबागोपाल फाऊंडेशनच्या वतीने कॅन्सरमुक्त भारत या कार्यक्रमाअंतर्गत ‘जगेगा भारत तो बचेगा भारत’ या मोहीमेला आजपासून (३१ जानेवारी) सुरूवात करण्यात आली आहे. मुंबईतल्या विलेपार्ले इथ आयोजित एका कार्यक्रमात पीटर सिंग आणि त्यांच्या पत्नी नीनो बोलत होते.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, जलपुरूष राजेंद्र सिह, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अनिल डिक्रुझ, फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी, दिल्लीचे पीटर सिंग आणि नीनो कौर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहीमेला सुरूवात झाली.
वाढते शहरीकरणामुळे आपण निसर्गाला नेस्तनाबूत करत आहोत. शेतीतल्या वाढत्या रासायनिक गोष्टीतून विषारी अन्न तयार होत आहे. त्यातून कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे पीटर सिंग यांनी सांगितले.
८० वर्षांचे पीटर सिंग हे दिल्लीचे रहिवाशी आहेत. त्यांच्या ७० वर्षीय पत्नीला ल्यूकमिया नावाचा कॅन्सर झाला होता. त्यामुळे पीटर सिंग यांनी घरातच सुमारे १२ हजार झाडं लावली. त्यात भाजीपाला, फळ झाडांचा समावेश आहे. पीटर सिंग यांनी एक्वॉटॉनिक्स हे तंत्र विकसित केले आहे. त्यात नदीतल पाणी आणून मासे सोडले जातात. त्या माशांचा कंपोस्ट तयार होतो. तो घरातील झाडांना खत म्हणून टाकला जातो. विशेष म्हणजे सिंग यांच्या घरातील झाडं ही मातीविना वाढवली जातात. खाण्यापिण्यासाठीच्या सर्व गोष्टी नैसर्गिकरित्या घरातच तयार केल्या जातात.
पीटर सिंग यांचं अडीच मजल्याचे घर त्यांनी हरितगृहात रूपांतरीत केले आहे. त्यामुळे त्यांच्या घरात दिल्लीतील प्रदुषित हवा जाते आणि शुद्ध होऊन ती बाहेर वातावरणात सोडली जाते. निसर्गाच्या अधिक जवळ गेल्याने आजारांवर मात होते, हे या दांपत्याने सप्रमाण सिद्ध केले आहे. कारण या दांपत्याला या वयात कुठलाही आजार नाही, ना गोळ्या औषधांचा आधार घ्यावा लागतो.
सिंग दांपत्याला नैसर्गिक पालेभाज्यांचं महत्त्व कळाले. त्यातूनच त्यांनी नैसर्गिक पालेभाज्या, फळे विक्रीचा व्यवसायही सुरू केला. त्यांच्या मते फ्रीजमध्ये अन्न ठेवून वारंवार गरम करून खाण्याने ते विषारी होत असते. हे टाळलं पाहिजे, असं त्यांचं मत आहे. मिळेल त्या ठिकाणी जास्तीत-जास्त झाडं लावा, आपलं शरीर हे अनमोल आहे, त्याचा आदर करायला शिका, असे आवाहन नीनो यांनी यावेळी केले.