नाणेगाव येथे केंद्रस्तर स्पर्धा परीक्षा नवोपक्रमाचे उदघाटन.
नानेगाव ,,(पाटण ) श्रीकांत जाधव
सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी टिकला पाहिजे, यासाठी प्रभावी नियोजन आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांसाठी नाणेगाव केंद्रास्तरावर राबविण्यात आलेला ‘नाणेगाव पॅटर्न’ हा सर्वांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रप्रमुख अर्जुन पाटील यांनी केले.
नाणेगाव केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख दादासाहेब गायकवाड यांच्या संकल्पनेतून केंद्रस्तर स्पर्धा परीक्षा नवोपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंथनचे केंद्रप्रमुख उमेश सुतार, सुरेश साळवे, दादासाहेब गायकवाड, अनिल कोळी, बी. जे. पानस्कर, अविनाश कडव यांची प्रमुख उपस्थिती होती.
उमेश सुतार म्हणाले, स्पर्धा परीक्षेचा ‘नाणेगाव पॅटर्न’ हा उपक्रम चाफळ बिटातील सर्व शाळांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. या उपक्रमाचे संकल्पक दादासाहेब गायकवाड यांनी शिक्षक सहकाऱ्यांना बरोबर घेत हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे.
याचा फायदा प्रज्ञा शोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन परीक्षा यासारख्या सर्वच परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. दादासाहेब गायकवाड म्हणाले, प्रभारी गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु केला आहे. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांचा पाया भक्कम व्हावा, यासाठी हा उपक्रम केंद्रास्तरावर राबविण्यात येत आहे.
या उपक्रमास केंद्रातील सर्वच शिक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे यापुढील काळात प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये या केंद्रातील मुले निश्चितच गुणवत्तेत अग्रस्थानी राहतील तज्ञ शिक्षिका वैष्णवी मोरे यांनी या नवउपक्रमाचे वार्षिक सूक्ष्म नियोजन कसे असेल, याचे पीपीटीद्वारे सादरीकरण केले. यावेळी सुरेश साळवे, अनिल कोळी, अविनाश कडव, बी. जी. पानस्कर, शंकर कोळपे, संतोष कोलते, लक्ष्मण जगताप, रोहिणी बाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दादासाहेब गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनिता साळुंखे यांनी केले. रुपेश वळसे यांनी आभार मानले.