चाफळ: प्रतिनिधी श्रीकांत जाधव
चाफळ विभागात गत आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे डोंगर माथ्याशी असलेल्या पाडळोशी, नारळवाडी, मुसळेवाडी, तावडेवाडी, मसुगडेवाडी, विरेवाडी, धायटी, दाढोली,डेरवण, वाघजाईवाडी गावांच्या परिसरात भात लागणीस सुरुवात झाली आहे. सध्या शेतकरी भात लागणीसाठी चिखलणी करत असून पैरेकरांच्या मदतीने भात लागणी करू लागले आहेत.
चाफळ भागात यंदाही इंद्रायणी व मेनका वाणाची विक्रमी भात लागणी बळीराजाने केली आहे.शेतीच्या कामासाठी शेतमजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांना मागेल ती हजेरी देण्याची वेळ बळी राजावर आली आहे.सध्या भात लागणीची कामे युद्ध पातळीवर सुरू असल्याचे चित्र संपूर्ण शिवारात पहावयास मिळत आहे.विभागात झालेल्या दमदार पावसाने नदी,ओढे,ओघळींना काही प्रमाणात पाणी आल्याने बळीराजा मिळेल त्या पाण्यावर भात लागण उरकण्यात मग्न असल्याचे चित्र दिसून येत आहे.