रायगड : ( धम्मशील सावंत )भिवंडी शहरात असणारी एन इ एस ही खाजगी व्यवस्थापनाची इंग्रजी माध्यमाची शाळा शिक्षण हक्क कायद्याद्वारे अर्थात आर टी इ 25% आरक्षित जागेवर प्रवेश झालेल्या वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क घेत असल्याच्या नोटीस पालकांना पाठवून वार्षिक शुल्क भरण्याचे फरमान बजावल्याने पालकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी यांच्या नेतृत्वाखाली शिस्तमंडळासह पालकांनी एन इ एस शाळेचे मुख्याध्यापक किरण वानखेडे यांची भेट घेऊन वार्षिक फी घेण्याचे प्रमाण मागे घ्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अनिल वाणी यांनी यावेळी दिला.
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा अधिनियम 2009 नुसार वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 25 टक्के आरक्षित जागेवर प्रवेश दिला जातो. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या कायद्याद्वारे मोफत शिक्षण दिले जाते. त्यांचे वार्षिक शुल्क भरण्याची जबाबदारी शासनानी घेतली असल्याने खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना शुल्क परतावा दिला जातो.
भिवंडी शहरातील एन एस ह्या शाळेच्या मुख्याध्यापकाने फर्मान काढून इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून जवळपास वर्षाला 22 हजार रुपये शुल्क भरण्याचे आदेश काढल्याने पालकांमध्ये शाळेच्या विरोधात असंतोष पसरलेला आहे. शाळा नाहक आर टी ई च्या विद्यार्थ्यांना टार्गेट करून त्यांचा शिक्षणाचा हक्क हिसकावून घेत असल्याचा आरोप बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी यांनी केला आहे.
भिवंडी महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री.उपेंद्र सांबारी यांची पालकांसहित अनिल वाणी यांनी भेट घेऊन एन ई एस शाळेच्या व्यवस्थापन आणि प्रशासनावर त्वरित कारवाई करून वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क अबाधित रहावा. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेऊ नये, पुस्तकांचे व युनिफॉर्मचे पैसे पालकांकडून घेऊ नये, तसेच आरटीई विद्यार्थ्यांना एकाच तुकडीत स्वतंत्ररित्या बसवू नये, त्यांच्यात भेदभाव करू नये अशा मागणीचे निवेदन शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी यांना बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात आले.