रायगड (धम्मशील सावंत )ग्रंथालीने प्रसिद्ध केलेल्या प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. राजश्री दयानंद कटके लिखित “स्त्रियांचे आरोग्य – ” या पुस्तकाचे प्रकाशन 12: जून रोजी विविध क्षेत्रातील प्रतिभावंत मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषदेच्या आमदार भारती लव्हेकर, डॉ. तात्याराव लहाने, पद्मा धामणे राव, पत्रकार राही भिडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, सुदेश हिंगलासपूरकर, डॉ. कटके यांच्या मातोश्री आणि सासरे मंचावर उपस्थित होते.
पुस्तकाचे प्रकाशन झाल्याचे जाहीर करून डॉ. गोऱ्हे यांनी हे फार महत्त्वाचे आणि सोप्या भाषेत लिहिलेले पुस्तक आहे, अशी पुस्तकाबद्दल प्रशंसा केली. त्या म्हणाल्या, स्त्रियांच्या आरोग्याविषयी अनेक पुस्तके आहेत, परंतु हे पुस्तक नेमकी माहिती देते. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्त्रियांच्या पर्समध्ये राहील या आकाराचे आहे. त्यामुळे ते हवे तेव्हा वाचता येईल. आज समाजमाध्यमातून अनेक प्रकारे उपचार सांगणारे व्हिडिओ टाकले जातात, त्यासाठी तपासणी करण्याबाबत सुचवले जाते.
मात्र त्यात किती तथ्य असते याचा विचार करायला हवा. डॉ. कटके यांचे पुस्तक आपल्या मनातील प्रश्नांची सुबोध पद्धतीने उत्तरे देते. वयाच्या विविध टप्प्यांवर होणारे आजार, त्यासाठी घ्यायची काळजी याबद्दल पुस्तकात माहिती आहेच, शिवाय आहारविहार, व्यायामाचे महत्त्व यातून शारीरिक आरोग्यासह मानसिक तंदुरुस्ती कशी राखावी याचेही मार्गदर्शन करते.
आपले मनोगत व्यक्त करताना लेखिका डॉ. राजश्री कटके यांनी म्हटले, की माझे रुग्ण नेहमी म्हणत तुम्ही फार छान समजावून सांगता, तुम्ही हे लिहीत का नाही? यामुळे मला लिहावेसे वाटले. ते डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांना दाखवले तेव्हा त्यांनीही हे पुस्तक प्रसिद्ध करायला हवे असे आग्रहाने सांगितल्यामुळे आज हा प्रकाशनसोहळा घडत आहे.
भारती लव्हेकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले. आज पुस्तकाचे प्रकाशन या मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होत आहे याचा आनंद वाटतो. आरंभी ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज दळवी यांनी केले.
ग्रंथालीने प्रसिद्ध केलेल्या डॉ. राजश्री दयानंद कटके लिखित “स्त्रियांचे आरोग्य – ” या पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर. (छाया :धम्मशील सावंत, पाली बेणसे )