न्हावरे ( ता.शिरूर ) येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून शासन निर्णयान्वये मान्यता मिळाली आहे .
न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन व्हावे यासाठी लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले होते .
न्हावरे गाव शिरूर तालुक्यातील मध्यवर्ती व दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे आहे .येथील बाजारपेठ मोठी असून या ठिकाणी परिसरातील खेड्यातील नागरिकांची बाजारहाटाच्या व इतर कामाच्या निमित्ताने नेहमी वर्दळ असते. त्याचबरोबर न्हावरे परिसरातील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे .
तसेच परिसरात होत असलेल्या अपघाताचे वाढते प्रमाण व न्हावरे ग्रामीण रुग्णालयात आरोग्यविषयक सेवा घेणाऱ्याची संख्या जास्त असल्याने येथील रुग्णालयात अनेकदा बेडची कमकरता भासत असे त्यामुळे न्हावरे येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी होती .
उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्यापासून ते या रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी मिळवण्यासाठी किशोरराजे निंबाळकर यांचा शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू होता .दरम्यान शुक्रवारी ( दि.४ ) रोजी ३० खाटांच्या न्हावरे ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
न्हावरे ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्याने ससून रुग्णालयात मिळणाऱ्या बहुतांशी आरोग्य सुविधा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत. न्हावरे ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्याने लवकरच येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम , पदनिर्मिती करुन नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
तसेच शस्त्रक्रियांसाठी आणखी एक अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या गंभीर आजारांसाठी राखीव बेड , अपघातग्रस्तांना तातडीचे वैद्यकीय उपचार , वेगवेगळ्या आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी वर्ग उपलब्ध होणार असल्याने रुग्णांंना उपचारासाठी इतरत्र पाठविण्याची गरज भासणार नाही.न्हावरे ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन केल्याने न्हावरे परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा अधिक गतिमान व मोफत पुरविण्याच्या दृष्टीने हे उपजिल्हा रुग्णालय फायदेशीर ठरणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करुन शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे .
तसेच याकामी लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले असल्याने त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले की, न्हावरे ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यामुळे लवकरच या परिसरातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळणार आहेत . तसेच या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून या परिसरातील आरोग्य व्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे .