पत्रकार व संविधान प्रेमींचे व्याख्यान, ‘रंग माझ्या महाराष्ट्राचा’ ऑर्केस्ट्राचे आयोजन, तक्षशिला बौद्ध विकास संघाचा पुढाकार
रायगड :धम्मशील सावंत
रायगडच्या रोहा येथील तक्षशिला बौद्ध विकास संघ, सांगडे यांच्या वतीने तथागत बुद्ध आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २३ मे रोजी करण्यात आले असून या कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे, तहसिलदार किशोर देशमुख, पोलीस निरीक्षक देविदास मुपडे गटविकास अधिकारी शुभदा पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष घनश्याम कराले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता जयंती महोत्सव चे अध्यक्ष यशवंत शिंदे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करून करण्यात येणार असून पूज्य भंते विशुद्ध बोधी यांच्या वतीने बुद्धपुजा पाठ व धम्मदेसना होणार आहे. शिवाय दुपारचे स्नेह भोजन झाल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत, संविधान अभ्यासक प्राध्यापक सुनील देवरे आणि मॅक्स महाराष्ट्र चॅनल व महापरीवर्तनवादी पत्रकार संघाचे अध्यक्ष धम्मशिल सावंत उपस्थित राहणार आहेत.
जाहीर सभा संपन्न झाल्यानंतर रात्री प्रबोधनकारी व मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून बुध्द भीम गीतांवर आधारित अमित पाटील प्रस्तूत ‘रंग माझ्या महाराष्ट्राचा ‘ या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मालसई ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व कार्यकारिणी, बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत व बौद्ध युवा संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तक्षशिला नगर सांगडे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.