प्रविण बागडे
नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल : pravinbagde@gmail.com
————————————————-
आज समाजाचे एकंदर चित्र पाहिल्यावर असे दिसते की, समाज हा गरीबी, अज्ञान, अंधश्रध्दा, भ्रष्टाचार, पिळवणूक, लोभ, अनैतिकता यांनी ग्रासित झाला आहे. अशा अशुध्द मानव निर्मित वातावरणात व्यक्तीचा विकास साधणे अशक्यप्राय गोष्ट आहे. मग अशा समाजाचा विकास कितीही साधण्याचा प्रयत्न केला तरी विकास साधता येत नाही. कारण त्या ठिकाणी व्यक्तीच्या विकासाची काहीही तरतूद नाही, म्हणून असा समाज अविकसित असतो. व्यक्ती विकासाला पूर्णपणे स्वातंत्र्य देवून समाज हा विकसित व सुसंस्कृत बनविण्याचा मार्ग म्हणजे भगवान बुध्दांनी सांगितलेला “आर्य अष्टांगिक मार्ग” आहे. सम्यकदृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मान्त, सम्यक आजिविका, सम्यक व्यायत, सम्यक स्मृति व सम्यक समाधी या अंगानी परिपूर्ण असलेल्या मार्गाला भगवान बुध्द आर्य मार्ग संबोधतात. अष्टांगिक मार्गाला संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा मानल्या जातो. त्यामुळेच व्यक्तीचा सर्वांगिण विकास उपरोक्त मार्गानुसार आचरण केल्यास “निब्बाण” प्राप्त करता येते.
भोग आणि क्लेश ही जीवनाची आत्यंतिक दोन टोके टाळून यामधला सुलभ, सरळ ज्ञानाचा सन्मार्ग म्हणजे तथागतांचा मध्यममार्ग होय. या मध्यममार्गाचा तथागतांनी केलेल्या शिकवणीचा उपदेश म्हणजे धम्म. सर्वप्रथम वैशाख पौर्णिमेचे महत्व समजावून घेणे आवश्यक आहे, कारण या दिवशी सिध्दार्थ गौतमाचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना वैशाख पौर्णिमेच्याच दिवशी घडतात ही काही साधारण बाब नाही, हा चमत्कार ही नाही. याला एक आगळं-वेगळं महत्व आहे, ही वस्तुस्थिती आहे, हे सत्य कोणीही नाकारु शकत नाही. ज्यांचा आज आपण जन्मोत्सव साजरा करीत आहोत, अशा स्थितप्रज्ञ महामानवास त्रिवार वंदन.
विश्वबंधुत्व, समानता व मानवी स्वातंत्र्य, एकमेकांविषयी प्रेम भावना, करुणेची भावना इत्यादि मानवाच्या कल्याणासाठी हितकारक गुणतत्वे जोपासणाऱ्या विज्ञाननिष्ठ, तर्कशुध्द, निर्भेड व विशुध्द जीवन मार्गावर आधारित अलौकिक अशा पवित्र धम्माची स्थापना करणारे जगातील पहिले क्रांतिकारी महामानव म्हणजेच तथागत भगवान गौतम बुध्द होत. सिध्दार्थ गौतमाने रोहिणी नदीच्या वादातून गृहत्याग केला व परिव्रजा घेतली. कपिलवस्तुहून राजगृहास आले असता मगधधिपती राजा बिंबीसार यांनी त्याची भेट घेतली. राजा बिंबीसार यांनी सिध्दार्थ गौतमास ऐहीक सुखोपभोगाबाबत उपदेश केला आपण पुन्हा कपिलवस्तुत परतुन राज्योपभोग घ्यावा, तेथे जाणे उचित वाटत नसल्यास मी माझे अर्धे राज्य आपणांस देतो तेथे आपण राज्य करावे अशी विनंती केली, परंतू संन्यासाचा जीवन मार्ग अवलंबू नये.
तद्प्रसंगी सिध्दार्थाने राजा बिंबीसारला विचारपुर्वक गांभीर्याने खणखणीत उत्तर दिले सुख म्हणजे उपभोग, असे सर्वसाधारण मानले जाते. कसोटीला लागल्यास त्यापैकी एकही उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही. तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, तसेच भुक शमविण्यासाठी अन्न हवे असते आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपडयांची आवश्यकता असते, झेापेची गुंगी घालविण्यासाठी बिछाना असतो, प्रवासाचा शीण होवू नये म्हणून वाहन असते उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते. तसेच शरीराची शुध्दी, आरोग्य यासाठी स्नान एक साधन असते. फक्त बाहय वस्तु म्हणजेच मानवाच्या दु:ख निवारण्याची साधने नव्हती. म्हणून अन्न-वस्त्र-निवारा इत्यादी मुलभुत गरजांना प्राधान्य न देता मानवी कल्याणाचा सुखाचा शोध घेण्यासाठी ज्ञान अर्थात शिक्षण महत्वाचे असते. मिळविलेल्या ज्ञान चिंतनातून मानवाच्या कल्याणासाठी खास जीवनमार्ग शोधला ज्ञानाने व्यक्तीचा सर्वागीण विकास घडविण्यास मदत होते, हा संदेश संपुर्ण विश्वाला तथागताने दिला.
व्यक्ति विकासासाठी मानवास शिक्षणाचे-ज्ञानाचे महत्व किती आहे, हे आपल्या देशातील अनेक महामानवाने जाणले. मानवाचे कल्याण त्याचे सुख कशात आहे. याचा शोध घेता महामानवांना आढळले की, प्रथम प्रत्येक व्यक्ति ही शिक्षित- ज्ञानी झाली पाहिजेत. शिक्षणज्ञान मानवाच्या कल्याणाचे, सुखाचे प्रमुख अंग आहे. त्याचा विकासत राजमार्ग आहे, हा राजमार्ग सर्वप्रथम जगाला दाखविला महाकारुणिक गौतम बुध्दाने. भगवान बुध्दांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू आहेत. त्यांच्या विविध पैलूंचा अभ्यास विविध अंगानी व विविध दृष्टीकोणातून होणे आज आवश्यक आहे. तथागत बुध्दाच्या व्यक्तीमत्वामध्ये ज्याप्रमाणे चुंबकीय तत्व होते, त्याचप्रमाणे त्यांचे तत्वज्ञानामध्ये असे चुंबकीय तत्व होते की, ज्यामुळे असंख्य लोक त्यांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित झालेले होतेच. परंतू त्याही पेक्षा कितीतरी पटीने त्यांच्या तत्वज्ञानाने, त्यांच्या तत्वज्ञानातील सभ्यतेने प्रभावित होऊन त्यांनी त्याचे अनुयायीत्व स्विकारलेले होते.
बुध्दाच्या व्यक्तिमत्वाची छाप व त्यांच्या तत्वज्ञानाची पकड इतकी मजबुत आहे की, भारत भुमीच्या या महापुत्राने केवळ भारताचाच नव्हे तर संपुर्ण विश्वालाच प्रभावित केलेले आहे. भारताच्या इतिहासामध्ये एवढा प्रतिभा संपन्न, प्रखर बुध्दिवादी, ध्येयवादी व मानवतावादी अजून कधी झालेला नाही. यापुढे देखील होणे नाही ज्याला संपुर्ण जग सन्मानपुर्वक विनम्र होत असते. बुध्द हा अशा स्वयं प्रज्ञेचा माणुस होता की, ज्याने जगाला पहिल्यांदा प्रखर बुध्दिवादाची व ध्येयवादाची शिकवण दिली. भगवान बुध्द म्हणतात, अत्त-दिपो-भव, अत्त-विरहत, अत्त-सरणी अर्थात हे मानव प्राण्यांनो स्वत:चे दिप व्हा, स्वयं प्रकाशित व्हा आणि स्वत:ला शरण जावून स्वत:चच विचरण करा, दुसऱ्या कुणालाही शरण जावू नका, दुसरा कुणीही तुम्हाला शरण जाण्या योग्य नाही तुम्ही स्वत:च स्वत:चे शरणस्थान आहात, यामध्ये जगाच्या सभ्यतेचा व संस्कृतीच्या इतिहासामध्ये भगवान बुध्दाने पहिल्यांदा मनुष्याला परा प्रवृत्ती, दैव, ईश्वर, आत्मा परमात्मा संकल्पना पासून मुक्त होण्याचा महामंत्र दिला व तो जोपासून ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे.
धम्म हा जीवनाच्या विविधांगी पैलूंना स्पर्श करणारा असतो. केवळ वैयक्तिक मोक्षप्राप्ती नसुन इतर सर्व मानवाला मोक्षदाता म्हणुन हितकारक व लाभदायी ठरणारा असतो. म्हणूनच सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, नौतिकमूल्ये अशा सर्वच बाबींना स्पर्श करणारा तो मोठा वर्तुळ परिघ ठरतो. ”बुध्द आणि कार्ल मार्क्स” या विषयी काठमांडू येथील विवेचनपूर्ण भाषणात त्यांनी समाजाला पर्यायाने प्रत्येक व्यक्तिला धम्माची नितांत गरज असल्याचे सांगीतले. “धर्म ही अफुची गोळी आहे, ही कम्युनिस्टांची धारणा फोल ठरविली”. जगातील सर्वधर्म सारखेच आहेत ही धारणाही त्यांनी उखडून फेकली. बुध्दाचा धम्म हा आकाशातील अनेक ताऱ्यां पैकी कसा वेगळा आहे, त्याचे तेज कसे वेगळे आणि दैदिप्यमान आहे, हे सत्य जाणून घेण्यासाठी त्यांनी सर्वांना आवाहन केले होते हे विसरता येत नाही.
बुध्दाचे चरित्र आणि चारित्र्य निर्मळ पाण्याच्या प्रवाहासारखे होते. तो करुणेचा महासागर होता, रंजल्या गांजल्यांचा तो कैवारी, सखा, मित्र आणि मार्गदर्शक होता. जगाच्या इतिहासात अशी माणसे अपवादात्मक असतात अशा सम्यक सम्बुध्दाला अनुसरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या पुढे सर्जनशील आदर्श निर्माण केला. बुध्द-बाबासाहेब हे आमच्या सर्वकष मुक्तीचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी आम्हाला सन्मार्ग उपलब्ध करुन दिला आहे, मार्गक्रमण आम्हाला करावयाचे आहे. त्यासाठी स्वयं प्रकाशित होवून आम्ही बुध्द-धम्म व संघ यांच्या प्रती एकनिष्ठ राहून धम्मचक्र प्रवर्तनाची सम्यक क्रांती गतीमान ठेवली पाहीजे. अशा महान तत्ववेत्यास त्यांच्या 2568 व्या जयंती निमित्त नमन…