दहा हजारांचे रोख पारितोषिक देऊन सचिन केदारेंचा गौरव,
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ढोकशेतच्या समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम
रायगड (धम्मशील सावंत )
:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त सुधागड मधील ढोकशेत येथील समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांनी ‘जग बदलणारा बापमाणूस’ या जगदीश ओहोळ यांच्या लिखित पुस्तकावर आधारित घेण्यात आलेल्या भव्य लेखी स्पर्धेमध्ये आपल्या अभ्यासू शैलीने सचिन केदारे यांनी प्रथम क्रमांक पटकावत दहा हजारांचे रोख पारितोषिक मिळवले आहे. यावेळी ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ हे स्वतः उपस्थित होते.
सचिन केदारे हे पेशाने शिक्षक असून त्यांचा सामाजिक कार्यात खुप मोठा सहभाग असतो. सचिन केदारे हे आंबेडकरवादी प्रबुद्ध शिक्षक संघ व अखिल भारतीय बौद्ध महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष आहेत. या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण रायगड मध्ये आयोजित केलेल्या वर्षावास मालिका, महापुरुषांचे जयंती महोत्सव तसेच विविध सामाजिक कार्यक्रमात सचिन केदारे यांचे बौद्ध धम्म तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आदी सर्व बहुजन विचारधारा असणाऱ्या महापुरुषांच्या जीवनावर आधारित व्याख्यान देण्याचे काम ते करीत असतात.
याशिवाय ते एक उत्तम सूत्रसंचालक देखील आहेत. अशा प्रकारचे हे बहुआयामी, हुशार व अभ्यासू व्यक्तीमत्व असलेले सचिन केदारे हे मूळचे खालापूरातील दहागाव छत्तिशी विभागातील करंबेली या ग्रामीण ठिकाणचे असून ते सध्या नोकरी निमित्त खोपोली या ठिकाणी वास्तव्यास आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त सुधागड मधील ढोकशेत येथील समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांनी ‘जग बदलणारा बापमाणूस’ या जगदीश ओहोळ यांच्या पुस्तकावर आधारित घेण्यात आलेल्या भव्य लेखी स्पर्धेमध्ये सचिन केदारे यांनी सहभाग घेतला होता.
सदरील परीक्षेचे आयोजन हे रविवार दिनांक १२ मे रोजी सकाळी ११ वाजता सुधागड तालुक्यातील परळी येथील डॉ. प्रभाकर गावंड हायस्कूल येथे सर्व जाती धर्मातील व सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी करण्यात आले होते. एकूण ५० गुण असलेल्या या लेखी परीक्षेचे स्वरूप पर्यायी प्रश्न पद्धतीचे होते आणि या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या स्पर्धकाला १० हजार, द्वितीय क्रमांक ७ हजार तर तृतीय क्रमांक ५ हजार असे उत्तेजनार्थ पारितोषिक ढोकशेत येथील समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ठेवण्यात आले होते.
या लेखी परीक्षेला संपूर्ण रायगड जिल्ह्यातून एकूण १०० स्पर्धक बसले होते. या १०० स्पर्धकामधून सचिन केदारे यांनी प्रथम क्रमांक मिळवून आपल्या ज्ञानाची चमक या स्पर्धेतून दाखवली आहे. त्यामुळे त्यांचे १४ मे रोजी ढोकशेत या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कार्यक्रमात आलेले प्रमुख पाहुणे शिवसेना नेते प्रकाश देसाई यांच्या हस्ते रोख १० हजार व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
यावेळी ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ स्वतः उपस्थित असल्याने या कार्यक्रमाची संकल्पना प्रत्यक्षात साकार होताना दिसत होती. यावेळी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे सुधागड तालुका अध्यक्ष राहुल सोनावळे , भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते पांडुरंग जाधव, वसंत केदारी, वंचित बहुजन आघाडीचे वैभव केदारी, समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.