मुंबई : नैसर्गिक शेतीतून उगवलेले धान्य हे रासायनिक शेतीच्या उत्पादित धान्यापेक्षा अधिक घातक असल्याचे मत झिरो बजेट शेतीचे जनक, पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केले. अंबागोपाल फाऊंडेशनच्या वतीने कॅन्सरमुक्त भारत या कार्यक्रमाअंतर्गत ‘जगेगा भारत तो बचेगा भारत’ या मोहीमेला आजपासून (३१ जानेवारी) सुरूवात करण्यात आली आहे. मुंबईतल्या विलेपार्ले इथ आयोजित एका कार्यक्रमात पाळेकर बोलत होते.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, जलपुरूष राजेंद्र सिह, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अनिल डिक्रुझ, फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहीमेला सुरूवात झाली.
कर्करोगाचे निदान होते, मात्र त्याच्या मुळापर्यंत वैज्ञानिक आजपर्यंत पोहचू शकलेले ना्हीत. त्यामुळे आपल्या शरीरात जाणारे सर्व घटक हे शुद्धच असले पाहिजेत, असे मत डॉ. पाळेकर यांनी व्यक्त केले. बाहेरून जे घटक शरीरात येतात आणि त्यांचा अंत होतो म्हणजेच कॅन्सर होतो. खाण्यापिण्याच्या सवयी, प्रदूषित पाणी, हवा आणि मानसिक तणावर ही कॅन्सर होण्यामागची कारण असल्याचे ते म्हणाले. त्यातही ९० टक्के आजार हे मानसिक तणावामुळे तर १० टक्के शरीरामुळे होतात. योग-साधनेमुळे ही परिस्थिती बदलत नाही तर त्यासाठी आपल्यालाच जाणिवपूर्वक प्रयत्न करावे लागतील, असेही डॉ. पाळेकर म्हणाले.
आपण अन्न प्राशन करतो तेव्हा दररोज विष खातोय. मग ते नैसर्गिक शेतीतून उत्पादित झालेले असो की रासायनिक शेतीतून. आजकाल नैसर्गिक शेतीतल्या उत्पादनांकडे कल वाढत चाललाय. जगाला अजूनही नैसर्गिक शेतीचा खरा अर्थ समजला नाही. प्रत्यक्षात नैसर्गिक शेतीतील उत्पादन हे रासायनिक शेतीच्या उत्पादनापेक्षा अधिक विषारी आणि घातक असल्याचे मत डॉ. पाळेकर यांनी सप्रमाण स्पष्ट केले.
विषारी अन्न खाल्ल्यानंतर शरीरात त्याचे घटक जमतात, हेच घटक रोगप्रतिकारशक्ती कमी करतात, तिथूनच आजार बळवण्याचे प्रमाण वाढत असल्याचे ते म्हणाले. सध्या पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आपल्यावर अधिक झालाय, त्यातूनच पाश्चिमात्य पद्धतीचे अन्न सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून आम्लधर्मी पदार्थांचे सेवन वाढले परिणामी कॅन्सरसारखे आजार वाढले आहेत. त्यामुळे सर्व आजारांचे मूळ असलेल्या आम्लधर्मी पदार्थांचे सेवन टाळण्याची गरज असल्याचे पाळेकर म्हणाले.
दूध, दही, तूप, साखर, तेल, तांदुळ, गहू हे आम्लधर्मी आहेत, तेच आजाराचे मूळ आहेत. त्यामुळे या पदार्थांऐवजी जेवनामद्ये फायबर (तंतूमय पदार्थ अधिक प्रमाणात सेवन केल्यास कुठल्याही प्रकारचे आजार होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दैनंदिन जेवणामध्ये ३.५ टक्क्यांपेक्षा अधिक फायबर असले पाहिजे. त्याऐवजी बाजरी, ज्वारी, भाजीपाला, डाळी, फळे या पदार्थांचं नियमित सेवन केल्यास कर्करोग होणार नाही आणि गोळ्या-औषधांची गरज पडणार नाही, असे मत डॉ. पाळेकर यांनी व्यक्त केले. शुद्ध हवा, पाणी आणि भोजन मिळणार नाही तोपर्यंत भारताला कॅन्सर आणि मधुमेहापासून मुक्ती मिळणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.