Ramdas Athwale

मी पीत नाही, रामदास आठवलेंचा कॅन्सरपासून वाचण्याचा फंडा

अंबागोपाल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आठवलेंची फटकेबाजी

मुंबई :

मी कधी आजारी पडत नाही, काय खाल्लं पाहिजे, काय पिले पाहिजे, हे मला माहिती आहे. मी तर पीत नाही, असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत केला आहे. अंबागोपाल फाऊंडेशनच्या वतीने आजपासून (३१ जानेवारी) कॅन्सरमुक्त भारतासाठी सुरू केलेल्या ‘जगेगा भारत तो बचेगा भारत’ या मोहीमेचे उद्घाटन आठवले यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आठवलेंनी खास शेरोशायरीतून कॅन्सर संदर्भात जनजागृती केली.

अंबागोपाल फाऊंडेशनच्या वतीने Helping Our Socitey Heal अर्थात HOSH या संकल्पनेवर आधारित ‘जगेगा भारत तो बचेगा भारत’ या मोहीमेला केंद्रीय राज्यमंत्री आठवलेंच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. हरीश शेट्टी, वॉटर मॅन ऑफ इंडिया रॅमेन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह, झिरो बजेट शेतीचे संकल्पक, पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या मोहीमेत सुमारे २ हजारांपेक्षा अधिक तरुण-तरुणींचा सहभाग लक्षवेधी ठरला.

फाऊंडेशनच्यावतीने कॅन्सरसंदर्भात जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे रामदास आठवले यांनी कौतुक केले. फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी यांचं कौतुक करतांना आठवले म्हणाले,

“जब आप पलट देंगे कॅन्सर के किताबों का पन्ना
तब आपको मदद करने आयेंगे डॉ. हरीश अन्ना”.

भारतात कर्करोग रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असली तरी केंद्र सरकारकडून त्यासंदर्भात मोठ्या उपाययोजना सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आणि लहान मुलांमध्ये कर्करोगाचे वाढत्या प्रमाणाकडेही आठवलेंनी उपस्थितांचे लक्ष वेधले. फाऊंडेशनच्या HOSH संकल्पनेवरही आठवलेंनी शायरी केली.

“आपके दिल में अगर होगा होश
तो मत दे दो कॅन्सर को दोष”

कॅन्सरसह इतर आजारांपासून वाचण्यासाठी दैनंदिन व्यायामाबरोबरच खाण्यापिण्याच्या सवयींवरही आठवलेंनी भाष्य केलं. यावेळी आठवलेंनी स्वतःच्या सवयींविषयी माहिती दिली. ते म्हणाले,” मी कधीही आजारी पडत नाही. कारण मला माहिती आहे, काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे, मी तर पीत नाही, मी तर फक्त स्वच्छ पाणी पितो, असं म्हणताच उपस्थितांमध्ये टाळ्यांचा हशा पिकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केले. पर्यावरणाचे संतुलन राहणे आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळेच पेड लगाव, पेड बचाव और कॅन्सर को देश से भगाओ, या मार्गाने आपण गेले पाहिजे, असे आवाहन आठवलेंनी उपस्थितांना केले. कॅन्सरमुक्त भारताची जबाबदारी ही आमची आहे. सरकार म्हणून आम्ही कॅन्सरवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करत आहोत. अशावेळी डॉ. हरीश शेट्टींनी कॅन्सरमुक्त भारतासाठी सुरू केलेले प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे आठवले म्हणाले. फाऊंडेशनच्या कॅन्सरमुक्ती संदर्भातील उपक्रमांचेही आठवलेंनी खास शायरीतून कौतुक केले.

“जो आपको हमेशा पुछता रहेगा हाल
उस फाऊंडेशन का नाम है अंबागोपाल
जो देश भर में फैल रहा है कॅन्सर का जाल
उसको खत्म करेंगे मोदीजी और अंबागोपाल”

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता. त्यांच्यामध्येही व्यसनाधीनतेविषयी जागृती करण्यासाठी आठवलेंनी एक शेर म्हटला.

“अगर हम बंद कर देंगे नशा
तो जीवन सुंदर बनने की है आशा”

यावेळी आठवलेंनी राजकीय भाष्यही केले. आठवलेंची मोदी सरकारमध्ये वर्णी कशी लागली, याचा किस्सा आठवलेंनी शेरोशायरीतून उपस्थितांना सांगितला. उपस्थितांनीही आठवलेंच्या शायरीला मनसोक्त दाद दिली.

“पहले तो दे दिया था मुझे धोका
मोदीजी ने दिया मुझे मंत्रिपद का मौका”

अंबागोपाल फाऊंडेशनच्या कॅन्सरमुक्त भारताच्या उपक्रमाच्या पाठिशी असल्याचेही आठवलेंनी यावेळी सांगितले. आठवलेंच्या या हटके आणि शायराना अंदाजमधल्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट दाद दिली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *