मुंबई – ज्येष्ठ रोटेरियन डॉ. राजेंद्र अग्रवाल यांना रोटरी इंटरनॅशनलच्या अत्यंत प्रतिष्ठित “सर्व्हिस अबॉव्ह सेल्फ “सन्मानाने गौरविण्यात आले आहे. संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “शुक्रिया “समारंभामध्ये डॉ. अग्रवाल यांना हा सन्मान रोटरी डिस्ट्रिक्ट-३१४१ चे गव्हर्नर अरुण भार्गव, नितीन मंगलदास व राजन दुआ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार फक्त असे निवडक १५० रोटेरियन्सना दिला जातो जे स्वेच्छेने आपली प्रतिभा आणि वेळ गरजूंच्या सेवेत समर्पित करतात. निसर्गोपचारच्या डॉक्टरी व्यवसायात असलेले डॉ. अग्रवाल हे रोटरी डिस्ट्रिक्ट-3141 चे गव्हर्नरपदावरही राहिले आहेत. आजवरच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी हजारो गरीब, गरजू, आदिवासी बाळांच्या हृदय शस्त्रक्रियेत मदत करून त्यांचे प्राण वाचवले आहेत.
याशिवाय आदिवासीबाहुल्य असलेल्या पालघर जिल्ह्यातील विविध भागातही ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी वेळोवेळी सायकली, पाणवठ्या व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. लोकसेवेच्या कार्यातील त्यांची सक्रियता आणि सातत्य आजही त्याचप्रकारे कायम आहे. यासाठी त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.