पेण( धाऊळपाडा ) : नितेश ह.म्हात्रे
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. अर्धवट अवस्थेत अडकलेल्या मुंबई- गोवा महामार्गावर आमटेम,धाऊळपाडा,पांडापूर-हवेली गावा नजिक यावर्षी देखील मोठमोठे खड्डे पडले असुन या खड्ड्यांच्या जाळ्याने या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी वाहन चालक हैराण झाले आहेत. पावसात पडलेले हे खड्डे भरण्याचे काम जरी सुरु असले तरी हे खड्डे भरताना तयार करण्यात येणाऱ्या मटेरिअल मूळे हे खड्डे कितपत टिकतील याची हमी देणे कठीणच झाले आहे.
एकीकडे संपूर्ण देशभरात विविध कामांच्या माध्यमातून रस्त्यांचे मोठमोठे जाळे पसरले जात असताना या मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दयनीय अवस्था लाजिरवाणी बाब ठरत आहे.
मुंबई गोवा हायवे वरून प्रवास,, नको रे बाबा. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून ऐकायला मिळत असून आता प्रवाशांसह वाहन चालक देखील संतप्त प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. मुंबई – गोवा महामार्गासाठी आत्तापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च झाले असुन देखील या महामार्गाचे काम पूर्ण होत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पेण तालुका लगत असणाऱ्या महामार्गावर सुस्थितीत असणारा रस्ता कमी आणि खड्डेमय महामार्ग जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली असुन अनेक ठिकाणी नुकतेच तयार झालेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याला देखील तडे जाऊ लागले तर काही ठिकाणी याच सिमेंटच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.
येणाऱ्या गणेशोत्सवात या महामार्गावरून कोकणात जाणारे लाखो प्रवासी प्रवास करणार असुन जर या महामार्गाची अशीच अवस्था राहिली तर गणेशभक्तांचा प्रवास हा खडतर होण्याची चिन्हे आहेत.
आधीच या महामार्गावरून प्रवास करणे नको झाले आहे, त्यातच पडलेल्या खड्ड्यांमध्ये निकृष्टदर्जाचा मटेरियल टाकला जात असल्याने दुचाकीस्वारांसाठी हा प्रकार जीवघेणा आहे.