मुंबई- राज्यात लोकसभा निवडणुकीत मविआला थोडे यश मिळाले त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारच्या खोट्या नरेटिव्हवर आपल्याला जिंकता येते असा फाजील आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण झालाय. त्याला चोख उत्तर देण्याचा प्रयत्न कामाच्या माध्यमातून महायुती सरकारने केला आहे, असे टिकास्त्र भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी अर्थसंकल्पीय भाषणावेळी विरोधकांवर केले. तसेच महाविकास आघाडी तीन तिघाडा काम बिघडा अशा प्रकारची आहे. तर आमची महायुती म्हणजे विकासाची त्रिमूर्ती समजून काम करताना दिसत असल्याचेही दरेकर म्हणाले.
अर्थसंकल्पावर बोलताना दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला विशेषतः युवा, महिला, शेतकरी, उपेक्षित वंचितांना न्याय देणारा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील जनतेच्या हिताकरिता मांडला गेला आहे. या सभागृहात आया-बहिणींवरून शिव्या देणाऱ्यांनी आया-बहिणींसाठी नेमके काय केलेय हे वाचावे, शिकावे. खोटे नरेटिव्ह सेट करणाऱ्यांचे थोबाड बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे. खोट्यानाट्या आरोपांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात ज्या तरतुदी केल्या आहेत त्यावरून दिसून येईल.
दरेकर पुढे म्हणाले की, एक ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय सरकारने भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून घेतलाय. त्याचे स्वागत व्हायला पाहिजे. कारण विरोधकांच्याही बहिणींना, त्यांच्या पक्षाच्या बहिणींना हा लाभ होणार आहे. त्याचे कौतुक सोडा त्यात चुका काढण्याचे प्रयत्न केले गेले. परंतु राज्यातील महिलांनी या योजनेचे अभूतपूर्व स्वागत केले आणि विरोधकांचे खोटे नरेटिव्ह पसरविण्याच्या प्रयत्न धुवून काढला गेला. तसेच हा वारकरी संप्रदायाला मानणारा महाराष्ट्र आहे. कधीनव्हे तो वारकऱ्यांच्या दिंडीला २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. तो निर्णयही विरोधकांच्या पोटात दुखला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अटल सेतूवर गेले. अटल सेतू आणि अप्रोच रोडच त्यांना कळत नाही. अप्रोचरोडला भेगा गेल्या होत्या त्यांनी सांगितले अटलसेतूला भेगा गेल्यात, असा टोलाही दरेकरांनी पटोले यांना लगावला.
बेरोजगारांच्या संदर्भात होत असलेल्या टिकेवर बोलताना दरेकर म्हणाले की, बेरोजगार युवकांना प्रशिक्षणासाठी १० हजार रुपयांची तरतूद या सरकारने केलीय. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी १ लाखाच्यावर सरकारी नोकऱ्या उपलब्ध होत असल्याचे सांगितलेय. वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळतेय. प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी मदत होतेय. वस्त्रोद्योग धोरण आणलेय त्यातून लाखोचा रोजगार होणार आहे. वाढवण बंदराच्या माध्यमातून एक लाखाची रोजगार निर्मिती होणार आहे. पण त्यालाही विरोध करायचा. कारण एखादा मोठा प्रकल्प झाला तर सरकारचे नाव होईल आणि आपले काय होईल ही भिती विरोधकांच्या मनात असल्याची टिकाही दरेकरांनी केली.
तसेच विरोधक शेतकऱ्यांसाठी सरकारला देणेघेणे नसल्याचे म्हणतात. पण अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांसाठी काळजी घेतलीय हे दिसून येईल. शेतकऱ्यांसाठी केंद्राने ज्याप्रमाणे ६ हजार रुपये दिले त्याप्रमाणे राज्य सरकारही ६ हजार रुपये शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून देत आहे. या राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा देण्यात आला असून संपूर्ण देशात कुठल्याच राज्यात पीकविम्याचा परतावा जेवढा महाराष्ट्रात दिला गेलाय तेवढा कुठेच दिला गेलेला नाही. महिलांबाबत क्रांतिकारी निर्णय घेत असताना ३ सिलिंडर, पिंक रिक्षा देण्याचा निर्णयही सरकारने घेतलाय. महिलांच्या उन्नतीसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. विरोधक दुधासंदर्भात सरकारवर टीका करतात. पण सरकार काय करतेय हे पाहत नाही. दूध उत्पादकबाबत सरकार काम करतेय. दुधाला ३५ रु. लिटर भाव सरकारने दिलाय. तसेच ५ रुपये लिटरचे अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचे दरेकरांनी सांगितले.
दरेकर पुढे म्हणाले की, दुष्काळासंदर्भात सरकारवर टीका केली जाते. सरकारने ४० तालुके, १०२१ ठिकाणी दुष्काळ स्थिती जाहीर केली. दुष्काळग्रस्ताना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होतोय. पंचनामे जलदगतीने होण्यासाठी ई-पंचनामे सुविधा सुरू केलीय. या सरकारने वीजमाफी करण्याचा निर्णयही घेतलाय. हे सरकार महिला, शेतकरी, युवा वर्गासाठी काम करताना दिसतेय मात्र विरोधकांचा खोटे बोलण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याची टिकाही दरेकरांनी केली.
दरेकर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मुंबई जिल्हा बँकेने मुंबई शहर आणि उपनगरांत झीरो बॅलन्स अकाऊंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील महिलांना शून्य रुपयांत खाते उघडायचे आहे. विरोधक न सांगता आमच्या महिला भगिनींची आम्ही काळजी घेतोय. परंतु विरोधकांना विकासावर बोलायचे नाही, कामावर चर्चा करायची नाही. बाहेर मोठ्या घोषणा करायच्या. माझा पक्ष, चिन्ह चोरले. खोके, गद्दार, संविधान बदलणार बोलायचे, अशा शब्दांत दरेकरांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.
समाजातील जे घटक आहेत, वंचित, उपेक्षित आहेत त्यांच्यासाठी महामंडळे काढली आहेत. त्या माध्यमातून निधी उपलब्ध करून समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल, त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचीही दखल अर्थसंकल्पात सरकारने घेतलीय. अनेक आदिवासी पाडे, तांडे, धनगरवाड्या आहेत. त्यांना जोडले जाणारे रस्ते वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कसे जोडले जातील याची काळजीही अर्थसंकल्पात घेतली असल्याचे दरेकर म्हणाले.
विरोधकांची वक्तव्ये संधीसाधूपणाची
दरेकर पुढे म्हणाले की, शरद पवार यांचे एक स्टेटमेंट ऐकले की आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्र पाठवले. त्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांचे, आदित्य ठाकरेंचे नाव घ्या. विकासावर, अर्थसंकल्पावर टीका करायला संधी नाही. मग अशा गोष्टी काढायच्या. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय का? अशा प्रकारचे फेक नरेटिव्ह सेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांचा सूरु आहे. मुंबई-गोवा महामार्ग आहे. पहिला १५-१६ वर्षाचा इतिहास तपासा. रविंद्र चव्हाण बांधकाम मंत्री झाल्यानंतर कोकणातील आमदारांनी उठाव, पाठपुरावा केला. रस्त्याचे काम पूर्ण झालेय. काही ठिकाणी काम सुरू आहे. परंतु मुंबई-गोवा रस्ता अजूनही दुरुस्त होत नाही अशा प्रकारचे सांगण्याचे काम सुरू आहे. अदानी, धारावीच्या बाबतीत विरोधक बोलतात. परंतु त्यांचेच नेते जेव्हा अदानींची पाठराखण करतात, बैठका होतात तेव्हा अदानी चांगला असतो. अशा प्रकारची संधीसाधू वक्तव्ये विरोधकांची दिसताहेत.
लोकं सुज्ञ आहेत
दरेकर म्हणाले की, धनुष्यबाण, मशाल संदर्भात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होता. जिंकलो तिथे संभ्रम नव्हता. ९ जागा जिंकले तिथे लोकांच्या मनात धनुष्यबाण आणि मशालचा संभ्रम नव्हता. मशालीला मते मिळाली. जिथे शिंदेंचे ७ उमेदवार निवडून आले. तिथे धनुष्यबाणावर मतं मिळाली. तिथे संभ्रम निर्माण झाला. लोकं सुज्ञ आहेत. लोकांना चिन्ह, माणसंही माहित असतात. पक्षाच्या विचारधारा कशा बदलताहेत हेही माहित असते. केवळ आरोपांचे काम सुरू आहे.
आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कारटं
दरेकर म्हणाले की, संभाजीनगरचा कार्यक्रम तेथे भाजपाचा नगरसेवक घेतला. त्याचा प्रवेश सोहळा चालू आहे. तो दुसऱ्या पक्षातून आपल्या पक्षात आला तर ते पुण्याचे काम.. तो चोरला नाही. त्याच कार्यक्रमात सांगायचे आमचा आमदार चोरला, पक्ष चोरला. आपण दुसऱ्याचा नगरसेवक चोरला त्याचे काही नाही. आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कारटं…ही मनोवृती योग्य नाही. राजकारणात आपण जे बोलतो ते पारदर्शक असले पाहिजे. परंतु आपल्या सोयीचे बोलण्याची पद्धत सुरू असल्याची टिकाही दरेकरांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
अर्थसंकल्पानिमित्ताने दरेकरांनी केलेल्या मागण्या
१) सीमाभागातील शाळांसाठी मदत जाहीर करावी.
२) राज्यातील सहकार विभागाशी जवळपास ६ कोटी लोकं संबंधित आहेत. अडीच-तीन लाख ठेवी सहकारात आहेत. सरकारच्या अर्थसंकल्पाच्या दुप्पट उलाढाली सहकारात होतात. सहकाराला उर्जीतावस्था देण्याची गरज आहे. सरकारने पतसंस्थांसाठी विमा कवच एक लाख केलेय. ते ५ लाखांचे करावे.
३) अनेक अर्बन बँका अडचणीत आहेत. सरकारने त्याला बॅकअप देण्याची गरज आहे. यासाठी सरकारने २०० कोटीची तरतूद करावी.
४) मुंबईत स्वयंपुनर्विकास आम्ही आणला. गृहनिर्माण संस्था पुनर्विकास करायला स्वतःच्या स्वतः गेल्या तर त्यांना आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून पैसे देतो. आज जवळपास ६ इमारती उभ्या राहिल्या असून १६०० प्रस्ताव आलेत. ४ टक्क्याचा व्याज परतावा त्या सोसायटीसाठी सरकारने द्यावा, अशा प्रकारची मागणी गृहनिर्माणच्या परिषदेत झाली. त्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तत्वतः मान्यता दिलेली. ती मागणी पूर्ण करावी.
५) सरकारचा जास्तीचा निधी जिल्हा बँकांमध्ये, सहकार चळवळीत गेला पाहिजे.
६) रायगड जिल्ह्याचा दोनशे-अडीचशे कोटींचा पर्यटन आराखडा केला आहे. त्याचे काय झाले? कोकणाने महायुतीला लोकसभा निवडणुकीत भरभरून दिलेय. कोकणासाठी चांगले मोठे पॅकेज द्यावे. यासाठी ५ हजार कोटींची तरतूद करावी.
७) एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यांची वाताहत झालीय. मुख्यमंत्री स्तरावर व्यापक बैठक घेऊन त्यांच्या पगाराचा प्रश्न मार्गी काढावा. मोठे डेपो, जागा आहेत. एसटी आणि बेस्ट या दोन्ही कर्मचाऱ्यांची कायमची पगाराची व्यवस्था होईल याची काळजी घ्यावी.
८) वनजमिनीवरील रहिवासी आहेत त्यांना नागरी मूलभूत सुविधा अजूनही मिळत नाहीत. पाणी, वीज मीटर मिळत नाही. त्या मूलभूत सुविधा देण्याची गरज आहे. तसेच त्यांच्या पुनर्विकासासाठी सरकारने प्रयत्न करावा.
९) पणनच्या माध्यमातून आठवडी बाजार आहे. शेतकरी टू ग्राहक अशी साखळी केली तर शेतकऱ्याच्या फळा-फुलांना, भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल.
00000