शिवु बेनसे भागात वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा विजवीतरण कार्यालयाला घेराव घालण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा

शिहू बेणसे विभागातील जनता विजसमस्येने हैराण, दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा विजवीतरण कार्यालयाला घेराव घालण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा

विजवीतरण विरोधात शिहू बेणसे विभागातील जनतेत संतापाची लाट, अन्यथा विजवीतरण अधिकाऱ्यांना कोंडून ठेऊ, महिला, तरुण आक्रमक 

 

वीज प्रश्नावर बेणसे सिद्धार्थ नगर येथे महत्वपूर्ण बैठक

 

पाली/बेणसे दि.(धम्मशिल सावंत) शिहू बेणसे विभागाची विजसमस्या मागील अनेक वर्षांपासून जैसे थे दिसून येते. वर्षाचे बारा महिने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा कोणत्याही ऋतूत विजबत्ती गुल होऊन विजेचा लपंडाव सुरूच असतो. वर्षानुवर्षे विजवीतरण विभागाकडून जनतेला वेठीस धरले जातेय. वीज समस्ये संदर्भात दि. (02) मंगळवारी बेणसे सिध्दार्थ नगर येथे बैठक पार पडली. या बैठकीत वीज वितरण विभागाने दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत केला नाही तर पेण विजवीतरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा यावेळी देण्यात आला. तर विजवीतरण विरोधात शिहू बेणसे विभागातील जनतेत संतापाची लाट असून दोन दिवसात उपाय करा अन्यथा विजवीतरण अधिकाऱ्यांना कोंडून ठेऊ, असा इशारा देत महिला आणी तरुण आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. यावेळी बबन अडसुळे,अ. का. म्हात्रे, विजय एटम, अनंत भुरे, अनिल शिंदे, उत्तम सावंत, योगेश अडसुळे, सुरेश भगत, सुनील पवार, प्रशांत गोरे, महेंद्र ठाकूर, हरेश पाटील, अनंत पाटील, नरहरी ठाकूर, प्रवीण म्हात्रे, सौ. कल्पना अडसुळे, सुमन अडसुळे, कविता अडसुळे, छायाबाई सावंत, पद्माआई अडसुळे, सुषमा अडसुळे,आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. आजघडीला पावसाळा सुरू असून संपूर्ण पेण तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात दिवसा व रात्री सातत्याने विजबत्ती गुल होत असल्याने शिहू बेणसे विभागातील जनता प्रचंड त्रासलीय. तर विजवितरण विभागाच्या विरोधात जनमानसातून असंतोषाची लाट उफाळून आलीय. शिव्यांची लाखोली देखील या दरम्यान वाहिली जात आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, पळता भुई थोडी करू, विजवीतरंण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात जनमाणसातून संताप व्यक्त केला जात आहे.  

 

अजून मुसळधार पाऊस व अतिवृष्टी सुरू झालेली नाही तरी विजवीतरण विभागाचा गलथान कारभार दिसून येत आहे. यावेळी ग्रामस्थ बबन अडसुळे यांनी सांगितले की विजसमस्या सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. शिहू बेणसे परिसरासह अन्य भागात विजेचा लपंडाव काही केल्या थांबत नाही . रात्री मच्छर रक्त पितायेत याबरोबरच उन्हाळ्यात उष्म्याने अंगाची लाहीलाही होतेय,येथील नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. विजेचा लपंडाव थांबवा, वीजपुरवठा सुरळीत करा, सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा संताप महिला वर्ग व तरुणाईतून व्यक्त होत आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत होणे नित्याचेच, मात्र सध्या उन्हाळ्याचे दिवस असून ही कधी दिवसा तर कधी रात्री विजबत्ती गुल होते.तसेच डास व मच्छरांच्या उपद्रवाने नागरीकांच्या आरोग्य देखील धोक्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विजेच्या लपंडावाने नागरिक , बालबच्चे वृद्ध सारेच बेजार झाले आहेत. हा प्रश्न जलद सोडविण्यात यावा असे अडसुळे यांनी सांगितले. तर माजी सरपंच अ.का. म्हात्रे म्हणाले की महाराष्ट्र राज्य विद्धुत विज वितरण मर्यादित कंपनी अंतर्गत शिहू बेणसे विभागात अनेक गावे आदिवासींवाड्यापाड्याना विद्युत पुरवठा केला जातो. 

 शिहू बेणसे विभागाला तालुका प्रशासनाकडून नेहमीच सापत्नपणाची वागणूक मिळत आहे. या ठिकाणी वारंवार विजबत्ती गुल होते. खंडित झालेला वीजपुरवठा केव्हा पूर्ववत होईल याचा अंदाज येत नसल्याने नागरिक सतत चिंतेत असतात. विजवीतरण अधिकारी व कर्मचारी मात्र मंद गतीने पाऊले टाकताना दिसत आहेत. विजबत्ती गुल झाल्यावर कर्मचारी नॉटरीचेबल होतात. विजवीतरण कर्मचाऱ्यांची कार्य तत्परता दिसून येत नाही. आजमितीस रोजच विजबत्ती गुल होत असल्याने रात्री अंधारात अधिक भीती वाढली आहे. शिहू बेणसे विभागातील जनतेला वर्षातील बाराही महिने विजसमस्येला सामोरे जावे लागत आहे. लवकरात लवकर विजेचा लपंडाव थांबवा अन्यथा विजवीतरण कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा म्हात्रे यांनी दिला. बेणसे सिद्धार्थनगरचे ग्रामस्थ उत्तम सावंत यावेळी म्हणाले की आताच्या काळात वीज ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. लहान मुले रात्रभर रडत आहेत, रुग्ण देखील त्रासले आहेत. वयोवृद्ध नागरिकांना तर अधिक त्रास होत आहे. तर सर्वात महत्वाचे म्हणजे वीज नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *