आंबेडकरी बहुजन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या निवृत्त मुख्याध्यापिका अंजलीमाई कांबळे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन
पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत)
बौद्धजन पंचायत समिती शाखा शिहू या शाखेचे सभासद तसेच बौद्धजन पंचायत रायगड जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष आयु सीताराम कांबळे यांच्या सुविद्य पत्नी रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त निवृत्त मुख्याध्यापिका अंजलीमाई सीताराम कांबळे यांचे दि.(22)शनिवारी रात्री उशिरा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 74 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
अंजलीमाई कांबळे या बौद्धजन पंचायत समिती पेण तालुकाध्यक्ष ऍड प्रमोद कांबळे, वैशाली येलवे,किरण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत.आंबेडकरी बहुजन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, अंजली माई कांबळे या नेहमीच परिवर्तवादी, पुरोगामी चळवळीत सक्रिय होत्या. अतिशय प्रेमळ , शिस्तबद्ध होत्याच, पण त्यांनी आपली सर्व कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली. आदर्श कन्या, आदर्श माता, आदर्श पत्नी, म्हणून त्यांनी आपली भूमिका योग्य रीतीने पार पाडली.
आपल्या मुलांवर आदर्श संस्कार घडवून त्यांना उच्च शिक्षण देऊन समाज आणि राष्ट्र हितासाठी कार्य करण्यास प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी केले. त्या सर्वांसाठी दीप स्तंभासारख्या मार्गदर्शक होत्या. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय ,धार्मिक चळवळीची अपरिमित हानी झाली असल्याची शोकाकुल प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे यांनी दिली.
परिवारावर समाजावर त्यांनी जीवापाड प्रेम केले, कौटुंबिक आधाराबरोबर समाजाच्या त्या आधारवड होत्या. ज्या वयात पतीला साथ द्यायची त्या वेळेत त्या निघून गेल्या. हे पारिवारिक दुःख आहेच पण सामाजिक दुःख देखील आहे. अंजली माईंच्या जाण्याने आंबेडकरी धम्म चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे. कांबळे परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशी आदरांजली या अंत्यविधी प्रसंगी प्रा.कवाडे यांनी वाहिली.
यावेळी धार्मिक, सामाजिक, राजकीय, शासकीय, सेवाभावी, पत्रकारिता आदी विभिन्न क्षेत्रातील मान्य वरांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली. यावेळी प्रा.जोगेंद्र कवाडे, पनवेल महानगरपालिका माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते महेश साळुंके, ज्येष्ठ आंबेडकरी नेते लक्ष्मण भगत, माजी सभापती संजय भोईर, माजी नगरसेवक पांडुरंग जाधव,जनार्दन जाधव,भारतीय बौद्ध महासभेचे पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनावणे, संजय पवार,शिंदे सर (रोहा), नागेश सुर्वे, नरेश गायकवाड, बबन अडसुळे, रवींद्र अडसुळे, समीर अडसुळे, जीवन अडसुळे, विनेश अडसुळे, ऍड: विशन अडसुळे, महापरिवर्तन वादी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष धम्मशील सावंत , शिहू बेणसे भावकी, बौद्धजन पंचायत समिती ग्रुप शाखा तालुका पेण, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, सभासद , भिमानुयायी , धम्मबांधव, बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत अंजलीमाई कांबळे यांचा जलदान विधी दि.30/06/2024 रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता रविराज फार्महाऊस म्हाडा कॉलनी पेण याठिकाणी होणार आहे.