अपूर्ण कामामुळे ग्रामस्थांची ससेहोलपट, शेकडो पर्यटक, ग्रामस्थांची वाहने चिखलात फसली
रस्त्याचे काम जलद पूर्ण न झाल्यास ग्रामस्थ उपोषण व आंदोलन करणार
तहसीलदारांना ग्रामस्थांचे निवेदन
रायगड (धम्मशील सावंत ) सुधागड तालुक्यातील पाच्छापूर ते दर्यागाव या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. त्यातच पाऊस पडल्यामुळे चिखल व राडारोडा झाला आहे. यातून ग्रामस्थांना, पर्यटकांना जिकरीचा प्रवास करावा लागत आहे.
अशातच याच मार्गालगत सुधागड किल्ला असून गडावर पोहचण्या साठी उपयुक्त मार्ग दुरावस्थेत असल्याने गडप्रेमी, दुर्ग प्रेमी देखील नाराजी दर्शवत आहेत. या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे ग्रामस्थांची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी मंगळवारी (ता.18) पाली-सुधागड तहसीलदारांना निवेदन दिले.
तसेच येत्या चार दिवसात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावली नाही तर ग्रामस्थ साखळी उपोषण व धरणे आंदोलन करणार आहेत. असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पाच्छापूर ते दर्यागाव या रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. या रस्त्याच्या कामाची सुरुवात फेब्रुवारीला करण्यात आली आहे. काम सुरू करताना वाहतुकीचा अडथळा नको म्हणून संबंधित प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या यंत्रणेने एसटी वाहतूक थांबवली.
सदरचे काम हे मे 2024 अखेर पूर्ण होणे गरजेचे होते. असे असूनही या रस्त्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे. या रस्त्यावर खडीकरणाचा भराव करण्यात आला आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने सगळीकडे चिखल व राडारोडा साठला आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीस योग्य राहिलेला नाही. त्यातच एसटी वाहतूक बंद झाल्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यायेण्यासाठी पायी प्रवास करावा लागत आहे.
परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे. तसेच आबाला वृद्धांना औषधोपचारा करिता पाली येथे येणे शक्य होत नाही. त्यामुळे दर्यागाव व पंचशील नगर ग्रामस्थांचे हाल होत आहेत. यासंबंधी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने अनेक वेळा संबंधित यंत्रणेच्या ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनिअर व मुख्य कार्यकारी अभियंता यांना वेळोवेळी संपर्क साधलेला होता.
मात्र संबंधित शासकीय यंत्रणेने आजपर्यंत ग्रामस्थांची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे तहसीलदार सुधागड पाली यांनी येत्या चार दिवसात संबंधित यंत्रणेच्या मुख्य कार्यकारी अभियंता, डेप्युटी इंजिनियर या शासकीय अधिकाऱ्यांची बैठक तहसील कार्यालयाच्या दालनामध्ये बोलवण्यात यावी व संबंधितांकडून सदरच्या अडचणी बाबत ग्रामस्थ व अधिकाऱ्यांची चर्चा घडवून आणावी आणि योग्य तो मार्ग काढावा ही विनंती करण्यात आली आहे.
अन्यथा दर्यागाव व पंचशील नगर ग्रामस्थ साखळी उपोषण व धरणे आंदोलन करणार आहेत. असे निवेदनात म्हटले आहे. तहसीलदार उत्तम कुंभार यांना निवेदन देतेवेळी, राम शिद, रोशन बेलोसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.