दोन वृद्ध महिलांचे मालकी शेती वाचविण्यासाठी आमरण उपोषण सुरू
77 वर्षाच्या सुलोचना चव्हाण अन्यायाचा पाढा वाचताना ढसाढसा रडल्या
जीव गेला तरी माघार नाही, आंदोलन कर्त्या वृद्ध महिलांचा इशारा
रायगड (धम्मशील सावंत) …….
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सॉल्ट रेस्टॉरंट चे मालक विरेन आहुजा या विकासकाच्या मनमानी कारभारा विरोध दोन वृद्ध शेतकरी महिलांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. शेतकरी अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांच्या शेतीलगत असलेल्या तळ्याची भिंत या रेस्टॉरंट मालकाने उंच केली आहे, असा आरोप उपोषण कर्त्यांनी केलाय.
शेतीलगत आरसीसी बांधकाम करून भिंत उभारल्याने पूर्वापार पाण्याचे नैसर्गिक निचरा होणारे मार्ग बंद झाले आहेत. परिणामी येथील सुपीक जमिनीत हे पाणी चार फुटापर्यंत तुंबत असल्याने दोन वर्षांपासून ही शेतजमीन नापीक झालीय. याविरोधात अनेकदा प्रशासन दरबारी तक्रारी निवेदन देण्यात आले.
तहसीलदार यांनी दिलेले आदेशाला आहुजा यांनी केराची टोपली दाखवल्याचे उपोषण कर्त्यांनी म्हटले . त्यामुळे वृद्ध शेतकरी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत रेस्टॉरंट बाहेर आमरण उपोषण सुरु केलेय. जिव गेला तरी चालेल आम्हाला न्याय मिळाल्या शिवाय आम्ही येथून हटणार नाही असा इशारा उपोषणकर्ते अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांनी दिलाय.
यावेळी बोलताना उपोषणकर्त्या अलका चव्हाण समेळ म्हणाल्या की आम्ही इथं 47 वर्षांपासून शेती करतो, 2021 पर्यंत आमच्या शेतीला कोणताही धोका नव्हता, मात्र आता 2022 ला विरेन अहुजा यांनी तलावाची उंची वाढवली, परिणामी आमची अडीज एकर जमीन पाण्याखाली गेली. शेतीत चार फूट पाणी साचतोय, यासंदर्भात आम्ही खालापूर तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे,
प्रशासनाकडून सर्व्हे करून मोजणी केली आणी सदर भिंत कमी करण्याचे आदेश दिले, मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली. आमच्या शेतीचे नुकसान झाले आहेच, मात्र शेतीपूरक कृषी व्यवसाय पर्यटनाचे, गुरांचा चारा, बोरिंग मध्ये पाणी शिरले असल्याने पिण्याच्या पाण्याचे नुकसान झाले असल्याचे सांगितले.
तलावाची उंची कमी करावी, आमचे दोन वर्षाचे झालेला नुकसान खर्च द्यावा ही मागणी उपोषण कर्त्या अलका समेळ यांनी केली.तर दुसऱ्या वृद्ध उपोषण कर्त्या सुलोचना चव्हाण यांनी अश्रू ढाळत आपल्याला होत असलेल्या त्रासाचा पाढा वाचला, आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमचे जीवन संपवू हाच आमच्यापुढे एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. यावेळी 77 वर्षाच्या वृद्ध सुलोचना चव्हाण अन्यायाचा पाढा वाचताना ढसाढसा रडल्या.