प्राचीन व मौलिक इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या लेण्या्, वास्तू ला इतिहास अभ्यासक व देश विदेशातील पर्यटकांची पसंती
देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण
रायगड (धम्मशील सावंत)
सुधागड तालुक्यात प्राचीन व बहुमूल्य लेण्यांचे समूह आढळतात. येथे ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेणी अशा भव्य लेणींचा समूह आहे. देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. मागील वर्षी येथील लेण्यांमध्ये अमेरिकेतील भन्ते वेन सुका ध्यानधारणेसाठी आल्या होत्या. तर अनेक देशविदेशातील अभ्यासक दौरे देखील करत असतात. जगभरातील पर्यटकांना भावणार्या या लेण्या स्तूप जतन करण्याची गरज निर्माण झालीय.
सुधागड तालुक्यात प्राचीन व भव्य लेण्यांचे समूह आढळतात. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या प्राचीन बौद्ध कालीन लेण्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथील ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेणी अशा भव्य लेण्यांचा समूह आहे. प्राचीन व मौलिक इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या या वास्तू इतिहास अभ्यासक व देश विदेशातील पर्यटकांच्या पसंतीच्या ठरतात. मात्र त्यांचे सुव्यवस्थित जतन व संगोपन होण्याची अतिशय आवश्यकता आहे.
या प्राचिन लेण्यांकडे प्रशासन व पुरातत्व विभागाचे फारसे लक्ष नसल्याने त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. प्राचीन व मौलिक इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या या वास्तू नामशेष होण्याची भिती त्यामुळे त्यांचे जतन व संगोपन होण्याची अतिशय आवश्यकता आहे. दरम्यान
उपद्रवी लोकांकडून रंग रंगोटी, व विद्रुपीकरण करण्यात येत असल्याने लेणी प्रेमी व पर्यटकात नाराजी दिसून येते.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या प्राचीन बौद्ध कालीन लेण्यांची पुरती दुरावस्था झाली आहे. येथिल स्तुप, विहार, चैत्यगृह, शिलालेख स्मारक यांची मोठया प्रमाणात पडझड झाली असुन त्यावर अनेक उपद्रवी लोकांनी चक्क ऑईल पेन्टने नावे लिहीली आहेत. त्यामुळे हि ऐतिहासिक व इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या या वास्तु नामषेश होण्याची भिती आहे.
ठाणाळे लेणी
ठाणाळे लेणी समुहात चैत्यगृह, स्मारक,-स्तुपसमुह, सभागृह व उर्वरित 21 विहार लेणी आहे. बहुतांश विहारांमध्ये व्हरांडे आणि एक किंवा दोन खोल्या असून त्यामध्ये शयनासाठी ओटे आहेत. काही विहारांमध्ये समोरच्या भागात दालन व चार पाच भिक्षुंच्या निवासाची व्यवस्था आहे. अशा विहारात आंतरदालन, प्रवेशद्वार, खिडकी व शयन ओटे आहेत. 5 पायर्या असलेल्या एका विहारात वाकाटककालिन रंगीत चित्रांचे काही अवशेष दिसतात. प्राकृत ब्राम्ही लिपीतील शिलालेख असलेले एक पाण्याचे टाके आहे. पाण्याचे हौद, टाके, ब्राम्ही शिलालेख भित्तीचित्र आहेत. या सर्वांची मोठया प्रमाणात पडझड झाली आहे. बरेच अवशेष भग्नावस्थेत आहेत. अनेक उपद्रवी लोकांनी येथील स्तुप, चैत्यगृह, स्मारक यावर चुन्याने व ऑईल पेन्टने आपली नावे कोरली आहेत. त्यामुळे या एैतिहासिक वास्तुचे सौंदर्य लुप्त झाले आहे. ठाणाळे लेण्यांसारखा ऐंतिहासिक व पुरातन ठेवा जतन करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष व प्रभावी उपाययोजना राबविण्यात यावी अशी मागणी पर्यटकप्रेमी व लेणीप्रेमी यांनी केली आहे.
ठाणाळे लेण्यांचा काळ हा इ.स. पुर्व दुसर्या शतकापासुन इ.स. 5 व्या शतकापर्यंत आहे. हि लेणी डोंगरामध्ये पश्चिमाभिमुख कोरलेली आहेत. लेण्यात सापडलेल्या विविध वस्तु व मोर्यकालीन चांदीची नाणी पाहाता ही लेणी 2200 वर्षापूर्वीची असल्याचे अनुमान काढण्या येते. लेण्यांचा दगड हा अग्निजन्य (बेसाल्ट) दगड आहे. शिल्पकलेच्या दृष्टीने अप्रतीम असलेल्या तसेच मानवी जिवनाच्या आर्थिक जडणघडणीत या लेण्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. हि लेणी समुद्र किनार्यावरुन चौल-धरमतर-नागोठणे खाडीमार्गे देशावर जाणारी व्यापारी केंद्रे होती असे म्हटले जाते. वाघजाई, घाटातून मावळात जाणारा प्राचीन मार्गही या लेण्यांजवळुन जातो. यामुळे ही लेणी चौल बंदराच्या सानिध्याने खोदली गेली आहेत. कोकणातून घाटमार्गे देशावर जात-येतांना विश्रांतीचे स्थान म्हणुन हया लेण्यांचा उपयोग केला गेला. त्याचबरोबर बौद्ध भिक्षूंच्या भदन्त, आचार्य, परित्राजक यांच्या निवार्यासाठी सुद्धा या लेण्यांचा उपयोग इ.स. 5 व्या शतकापर्यंत करण्यात आला आहे.
या लेण्या अतिशय प्राचिन असुन एैतिहासिक दृष्ट्या खुप महत्वाच्या आहेत. त्यामुळे पुरातत्व खात्याने वेळीच या लेण्यांची डागडुजी व देखभाल करणे गरजेचे आहे. येथे येणार्या पर्यटकांनी लेण्यांवर नावे टाकुन येथील सौदर्याला गालबोट न लावता, येथिल परिसर साफ व संरक्षित कसा राहिल याची दक्षता घेतली पाहीजे. असे आवाहन बौद्ध समाज युवा संघ रायगड व महा परिवर्तन वादी पत्रकार संघाच्या पदाधिकारी, सभासद यांनी केले आहे.
ठाणाळे लेण्यांपर्यंत कसे पोहचाल ?
पालीपासुन ठाणाळे हे गाव 15 किमी अंतरावर आहे. ठाणाळे या गावी येण्यासाठी नाडसुरपर्यंत एस.टी.ची सुविधा उपलब्ध आहे. नाडसुर ते ठाणाळे हे 2 कि.मी. अंतर असून तेवढेच अंतर लेण्याकडे जाण्यासाठी चालावे लागते. ठाणाळे गावच्या पुर्वेकडे असलेल्या जंगलामध्ये ही लेणी आहेत. त्या भागाला चिवरदांड असे म्हणतात. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ही येथे आश्रय घेतला होता.
नेणवली व चांभार लेणी
खडसांबळे व नेणवली गावाजवळ सह्याद्री पर्वतात नेणवली लेण्या आहेत. लेण्याचा मार्ग या दोन्ही गावापासून खरबाच्या वाटेने घनदाट अशा लेण्या डोंगरांमध्ये जातो लेणी गावापासून साधारण अडीच किमी अंतरावर आहेत व येथील जंगल राखीव वनक्षेत्र आहे. अतिशय दुर्गम असलेल्या या लेणी समूहात एकूण 21 लेण्या आहेत. काही लोक पूर्वापार या लेण्यांना पांडवलेणी म्हणूनच संभवतात.
लेण्यांतील सर्वात मोठ्या सभागृहाच्या मागच्या बाजूस उंच व मोठा घुमट आहे. घुमट दगडांमध्ये व्यवस्थित कोरला आहे. घुमटचा व्यास 1.5 मीटर उंची 3.5 मीटर आहे. घुमटाच्या अगदी वर मध्यभागी झाकणासारखा आकार असून चौरसाकृती छिद्र आहे. स्थानिक लोक या घुमटाला रांजण म्हणतात. या लेण्यातील सभागृहे सर्वात मोठे लेणे आहे. याचा दर्शनी भाग कोसळला असला तरी छत सुरक्षित आहे. महाराष्ट्रातील अतिविशाल सभागृहांमध्ये याचा समावेश होतो. हे सभागृह 21 मीटर बाय 16 मीटर एवढे विशाल आयताकृती आहे. या सभागृहाचे डाव्या बाजूस व मागील भिंतीत एकूण 17 खोल्या खोदलेल्या आहेत. प्रत्येक खोलीत दगडी ओटा आणि चौकोनी खिडकी आहे. काही खोल्या एकांतवासासाठी खोदल्या आहेत. सभागृहांमध्ये ठाणाळे लेण्यांप्रमाणे नक्षीकाम नाही किंवा लेण्यांचा काळ ठरवण्यासाठी शिलालेख नाही. सभागृहाच्या पुढील बाजूस पाणी साठवण्याचे बंदिस्त टाके आहे. लेण्यांमध्ये काही ठिकाणी भिंतीस लागून शयन कोठे बांधले आहेत. व भिंतींमध्ये कोनाडे ठेवण्यात आले आहे. लेणी समूहात एकूण अकरा लेणी असली तरी मुख्य सभागृह व त्याच्या बाजूकडील सदनिका वगळता काही ठिकाणी लेणी कोसळली आहेत. याच लेण्यांच्या पश्चिम बाजूस अर्धा किलोमीटर अंतरावर चांभार लेणी आहेत. परंतु येथील डोंगराचे कडे तुटल्याने येथे जाता येत नाही. या लेणी समूहाचा उपयोग चौल बंदरातून नागोठणे मार्गे मावळात जाणाऱ्या व्यापारी मार्गासाठी केलेला आहे. ही प्राचीन लेणी 1889 पर्यंत जगात अपरिचित होती परंतु 1890 मध्ये रेव्हरंड ऍबंट यांनी लेण्यांचा प्रथम शोध लावला. तेव्हा पासून या लेण्यांची काहीही दुरुस्ती झालेली नाही. प्रतिकूल निसर्ग परिस्थिती व मानवी देखभालीची उदासीनता यामुळे लेण्यांचा हा सांस्कृतिक ठेवा यापुढे आणखी किती काळ आपले अस्तित्व टिकवून ठेवेल याबाबत शंका आहे.
नेणवली लेण्यांपर्यंत कसे पोहोचाल ?
पालीपासुन नेणवली व खडसांबळे हे गाव साधारण 15-16 किमी अंतरावर आहे. खडसांबळे गावी येण्यासाठी पालीवरून एस.टी.ची सुविधा उपलब्ध आहे. खडसांबळे ते लेणी चालत पार करावे लागते.
गोमाशी लेणी
गोमाशी येथे बौद्ध लेणी समूह आहे. त्याला काही लोक भृगु ऋषींचे लेणी देखील संबोधतात. गोमाशी गावाजवळ सरस्वती नदीकाठी खोंडा नावाचा डोंगर आह. या डोंगरातील एका घळीत घळईत 1.5 मीटर उंचीची गौतम बुद्धांची प्रतिमा कोरण्यात आली आहे. कोणी याला भृगु ऋषींची मूर्ती म्हणते. हे ठिकाण म्हणजे नागोठणे खाडीमार्गे ताम्हणी घाटात मावळात जाणाऱ्या मार्गावरील एक लेणे आहे. या लेण्यांकडे जायचे असेल तर पाली पासून गोमाशी अंतर 14 किमी आहे. गोमाशी गावापर्यंत एसटीची सोय आहे. या लेण्यांमध्ये देखील मोठी पडझड झाली आहे. लेण्यांपर्यंत जाणाऱ्या मार्गाची देखील दुरवस्था झाली आहे.
जोपासण्याची गरज
येथिल स्तुप, विहार, चैत्यगृह, शिलालेख स्मारक यांची मोठया प्रमाणात पडझड झाली असुन त्यावर अनेक उपद्रवी लोकांनी चक्क ऑईल पेन्टने नावे लिहीली आहेत. त्यामुळे हि ऐंतिहासिक व इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या या वास्तु नामषेश होण्याची भिती आहे. प्राचीन इतिहासाची साक्ष देणारा हा मौलिक ठेवा जोपासण्याची नितांत गरज आहे. अनेक देश विदेशातील पर्यटक व बौद्ध अभ्यासक इथे भेट देत असतात. पर्यटकांना योग्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी पर्यटन वाढीला देखील खूप संधी आहे. तसेच हौशी पर्यटकांनी येथील वास्तूला विद्रुप किंवा हानी करू नये.